पुणे : भारतीय जनता पक्षात जुन्या कार्यकर्त्यांना कोणतेही स्थान नाही. मी भाजपाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निघालो होतो. मात्र, माझा शिवसेनेतील प्रवेश उद्धव ठाकरे यांना सांगून पंकजा मुंडे यांनी अडवला, असा आरोप भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड यांनी केला. कराड हे बीड जिल्हा भाजपाचे दहा वर्षे अध्यक्ष होते. भाजपाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे कराड हे कट्टर समर्थक होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपाला विशेष महत्व आहे.
गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे सर्वमान्य नेते होते. राज्यातील वंजारी समाजाला त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एक ओळख दिली. ते हयात असेपर्यंत समाज एकमुखी त्यांच्यामागे उभा होता. मात्र, सध्या हा समाज दिशाहीन झाला आहे. समाजाला एकत्रित ठेवत व्यापक दिशा देण्याची गरज आहे, असे कराड यांनी सांगितले. स्वर्गीय मुंडे यांची कामाची पद्धत वेगळी होती. सर्वांना सामावून घेत पुढे जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. पंकजा मुंडे यांची कामाची पद्धत वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीआधीदेखील त्यांना मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कामाच्या पद्धतीत त्यांनी कोणताच बदल केला नाही. त्या कायम हवेत राहिल्या. जुन्या जाणत्यांना सन्मान दिला नाही. मी त्यांची ढाल बनून पुढे उभा राहिलो होतो. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी माझ्यावर बीडची, परळीची कोणतीही जबाबदारी दिली असती तर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले नसते. त्यांनी राज्य सांभाळून मोठे नेतृत्त्व त्यामुळे करता आले असते, असे कराड यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल केला आहे. ते फोन घ्यायला लागले, असे कराड यांना स्पष्ट केले.
मी स्वतः या साऱ्या बाबींना कंटाळून शिवसेनेत जायला निघालो होतो. आमच्या गाड्या मुंबईकडे निघाल्या होत्या. त्या वेळी पंकजा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. फुलचंद कराड हा माझाच माणूस आहे. त्यांना तुम्ही शिवसेनेत प्रवेश देऊ नका, असे पंकजांनी ठाकरेंना सांगितले. त्यामुळे माझा प्रवेश थांबला. मला भाजपमध्येही जबाबदारी दिली जात नाही आणि दुसऱ्या पक्षातही जाऊ दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षात बहुजनांवर अन्याय केला जात आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासाराख्या नेत्यांना बाजूला ठेवले जात आहे. त्यामुळे या समाजातील नेते व कार्यकर्ते पक्षापासून दूर जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. यापुढील काळात वंजारी समाजासाठी काम करणार असून समाजाच्या वाढीव आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून त्यासाठी समाजाला एकत्र करून लढा उभारणार असल्याचे सांगितले.
‘सरकारनामा’शी बोलताना कराड यांनी वंजारी समाजासाठी वाढीव आरक्षण, गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे कामकाज तसेच औरंगाबाद येथील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा प्रश्न यापुढील काळात सकल वंजारी समाज समन्वय समितीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजातील २१ संघटनांनी रविवारी पुण्यात एकत्र येत सकल वंजारी समाज समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मुख्य समन्वयकपदी कराड यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब सानप यांची मुख्य सहसमन्वयक तर नामदेव सानप यांची निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली आहे.

