राष्ट्रवादीनं आपल्याच सभापतीसह तीन सदस्यांना पाठवलं घरी
Collector disqualify 3 NCP members of Bhor panchayat samiti

राष्ट्रवादीनं आपल्याच सभापतीसह तीन सदस्यांना पाठवलं घरी

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी तिघांचं सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश काढले आहेत.

भोर : पक्षाचा व्हीप डावलल्यानं भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव यांच्यासह पंचायत समिती सदस्य श्रीधर रघुनाथ किंद्रे व मंगल सोपान बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. त्यामुळं राष्ट्रवादीन आपल्याच सभापतीसह तीन सदस्यांना घरी पाठवल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. (Collector disqualify 3 NCP members of Bhor panchayat samiti) 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी मंगळवारी तिघांचं सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी दमयंती जाधव, श्रीधर किंद्रे व मंगल बोडके यांनी पक्षानं बजावलेल्या व्हीपचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यावर निर्णय देताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

भोर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेना व काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी १ सदस्य आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. ता. 18 फेब्रुवारी रोजी सभापतीच्या निवडीवेळी राष्ट्रवादीकडून लहू शेलार यांच्या नावाचा व्हीप चारही सदस्यांना बजावण्यात आला होता. परंतु, दमयंती जाधव यांनी व्हीप डावलून सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. श्रीधर किंद्रे त्यांना सूचक झाले. त्यावेळी शेलार यांनी अर्ज न भरता जाधव यांनाच मतदान केलं. त्यामुळं त्या निवडूण आल्या. 

या निवडणुकीनंतर महिनाभरातच गारटकर आणि शेलार यांनी 17 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. त्यावर जिल्हाधिकारी देशमुख यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत तिघांचे सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश मंगळवारी काढला. तिघांचं सदस्यत्व रद्द झाल्यानं आता पंचायत समितीत राष्ट्रवादीचे एकच सदस्य उरले आहेत. राष्ट्रवादीनं आपल्याच सदस्यांचं सदस्यत्व रद्द केल्यानं तालुक्यात चर्चेला उधाण आलं आहे. 

दरम्यान, लहू शेलार यांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यावर विश्वास ठेऊन पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पक्षाशी प्रामाणिक राहिल्यावर निश्चित न्याय मिळतो, हे या निर्णयावरून सिद्ध झाल्याचे शेलार यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in