सरकारच्या वर्षपूर्तीलाच मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा योगायोग! - CM Thackeray and PM Modi will meet on the anniversary of Thackeray govt | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारच्या वर्षपूर्तीलाच मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीचा योगायोग!

अमोल कविटकर
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

मोदींच्या दौऱ्याला शरद पवार उपस्थित राहणार का, याची उत्सुकता 

पुणे : कोरोनावरील अंतिम टप्प्यात असलेल्या लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेला भेट देणार असून यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही मोदींच्या स्वागताला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहिल्यास मुख्यमंत्रीपदाच्या वर्षपूर्तीलाच उद्धव यांची नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. कोरोना लसीच्या अनुषंगाने हा योगायोग घडून येणार आहे. यावेळी राज्याकडून होणारे स्वागत स्वीकारताना पंतप्रधान मोदी हेही ठाकरेंना परतफेड म्हणून ठाकरे सरकरच्या वर्षपूर्तीच्या शुभेच्छा देणार का, याची उत्सुकता आहे.

पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा शनिवारी २८ नोव्हेंबरला निश्चित झाला असून या दौऱ्याला पुण्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनीही दुजोरा दिलेला आहे. कोरोनावर लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असून ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. याचीच सविस्तर माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी सिरमला भेट देत आहे. शनिवारी दुपारी एक ते दोन अशी वेळ या दौऱ्याची वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर ते हवाई मार्गानेच सिरम इन्स्टिट्यूटला जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी पुणे विमानतळावर दाखल झाल्यावर राज्याच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करतील. उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला अद्यापपर्यंत दुजोरा मिळाला नसला तरी पंतप्रधानांचे स्वागत राज्यात मुख्यमंत्र्यांकडून होण्याचा संकेत  आहे. त्यामुळे मोदींच्या स्वागताला ठाकरे उपस्थित असतील, असे निश्चित मानले जात आहे. योगायोग म्हणजे २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती आहे. यावेळी मोदी महाराष्ट्राच्या वतीने होणारे स्वागत स्वीकारून ठाकरेंनाही शुभेच्छा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला उपस्थित राहतील हे निश्चित असले तरी ते सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीदरम्यान उपस्थित असतील का? याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. तसेच पंतप्रधान मोदींच्या सिरम भेटीदरम्यान राज्यातील इतर कोणते नेते उपस्थित राहणार? याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटला लसीसंदर्भात माहितीसाठी दोनदा भेट दिली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भेटीवेळी तेही उपस्थित राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख