बिहारमधील भाजपच्या यशात फडणविसांचा वाटा मोठा? : पवारांच्या उत्तराने पिकला हशा! - Answer by Sharad Pawar on question of fadnavis brought laughter! | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमधील भाजपच्या यशात फडणविसांचा वाटा मोठा? : पवारांच्या उत्तराने पिकला हशा!

सागर आव्हाड
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

पवारांनी घेतली फिरकी!

पुणे : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते. तर दुसर्‍या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता तेजस्वी यादव निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ती त्यांची मोठी कामगिरी म्हणायला लागेल. तेजस्वी  यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

बिहार निवडणुकीच्या निकालावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी तेजस्वी यांचे तोंड भरून कौतुक केले. बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती.  परंतु तेजस्वी यादव यांना मदत व्हावी यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिलं नाही, असेही स्पष्ट केले.

बिहारमधील निवडणूक निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल हे, सांगता येणार नाही. तामिळनाडूमध्ये तर परिणाम होईल, असे वाटत नाही. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काय होईल हे बघावे लागेल, असे पवारांनी सांगितले.

या निवडणुकीचे प्रचारप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक भाजपने केली होती. या निवडणुकीत भाजपची चांगली कामगिरी देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळे झाल्याचे बोलले जात आहे, तुमचे मत काय, असा प्रश्न विचारल्यावर पवारांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती. ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद, असे उत्तर दिले. त्यावर मोठा हशा पिकला. 

मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो ते रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात आलेल्या मदतीचा चेक सुपूर्द करण्यासाठी. या भेटीत राजकारणावर आणि  विधान परिषदेच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकीबद्दल, तेथील जागांबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले.

अलिबागमध्ये आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक यांच्या कुटुंबासोबतचे पवार यांचे फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. त्यावर पवार म्हणाले की नाईक कुटुंब मला भेटल्याचे फोटो जे व्हायरल होत आहेत ते फोटो पाच वर्षांपूर्वीचे आहेत. राज्यपालांनी अर्णव गोस्वामी च्या काळजीपोटी फोन केला ही चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय त्यांच्याबद्दल ही थोडी सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असते, असाही टोला लगावला.

अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केली जात असलेली वक्तव्य ही त्यांच्या वयाला शोभणारी नाहीत, असेही भाष्य त्यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर केले.

पवार कुटुंबियांनी बारामतीत एकत्रित दिवाळी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल विचारले असता कोरोनाबात  काळजी घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी देखील  याबद्दल आवाहन केले आहे.  त्यामुळे यावेळी दिवाळीत लोकांना न भेटण्याचा निर्णय घेतलाय.  बाकी काही  नाही, असे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख