अगोदर वाळू तस्करांनी पाठलाग केला...मग तहसिलदार स्वप्नालीने त्यांची झोप उडवली! 

अगोदर वाळू तस्करांनी पाठलाग केला...मग तहसिलदार स्वप्नालीने त्यांची झोप उडवली! 

पुणे : वाळू तस्करांकडून महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना होतात, मात्र पारनेरच्या घटनेत जास्तच झाले. तहसिलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने महसूलची यंत्रणा अनामिक भीतीखाली आली. मात्र अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेच्या तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी वाळू तस्करांना भीती बसवणारी कारवाई करुन दाखवली आहे. 

वाळू तस्कर हे कोणाला जुमानत नाहीत, हा सार्वत्रिक अनुभव आहे. विशेषत: महिला तहसिलदार असतात, तिथे ते अधिक निर्धास्त राहतात. मात्र स्वप्नाली डोईफोडे यांनी रात्री 2 वाजता कोणतेही संरक्षण न घेता रस्त्यावर उतरुन केलेली कारवाई तस्करांना धडकी भरवणारी ठरली आहे. 

वाळू तस्कर त्यांच्या खबऱ्यांकरवी कायम पाळत ठेवतात, हे स्वप्नाली यांना माहिती होते. त्या चारचाकीतून निघाल्या की दुचाकीवरुन, हे वाळू तस्करांना लगेच कळते, इतकी त्यांची यंत्रणा सक्षम आहे. यापार्श्‍वभूमीवर नागपूर-औरंगाबाद हायवेवर कारवाई करताना त्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. त्यांनी शासकीय गाडीत तलाठ्याला बसवून गाडी पुढे पाठवली. स्वत: मात्र खासगी गाडीत बसल्या. शासकीय गाडी निघाली की वाळू तस्करांच्या दोन तीन स्विफ्ट पाठलाग करु लागल्या. त्यादरम्यान स्वप्नाली यांनी खासगी गाडीने जावून वाळू तस्कारांचे 5 ट्रक पकडले. त्यानंतर शासकीय गाडी बोलावून ती वाहने तहसिल कार्यालयाकडे पाठविली. 

स्वप्नाली यांनी आपली कारवाई पुढे चालूच ठेवली, मात्र वाळू तस्करांची वाहने त्यांच्या खासगी गाडीचा पाठलाग करु लागली. तस्करांचे खबरी त्यांना माहिती देत असल्याने वाळूची वाहने सापडत नव्हती. बराचवेळ पाठलाग सुरु होता, मग स्वप्नाली यांनी तस्करांच्या वाहनांना चकवा दिला. त्यांना दिसणार नाही, अशा ठिकाणी त्या थांबल्या. त्यानंतर सरकारी गाडी बोलावली, तर तिचाही पाठलाग सुरु केला. मग त्यांनी शासकीय गाडी परत पाठवली. शासकीय गाडी तस्करांच्या खबऱ्यांना दिसेल, अशा ठिकाणी लावून ठेवली. परिणामी कारवाई सोडून मॅडम गेल्याचा मेसेज फिरला आणि पुन्हा वाळूच्या गाड्या सुरु झाल्या. त्यानंतर खासगी गाडीने जावून लगेच त्या पडकल्या. पुन्हा शासकीय गाडी बोलावून ती वाहने तहसिल कार्यालयात नेण्यात आली. स्वप्नाली यांनी तस्करांना प्रत्येक डाव उधळून लावला. या कारवाईमुळे स्वप्नाली यांच्या धाडसाची चर्चा जिल्ह्यात होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com