pune-sharad-pawar-criticises-narendra-modi | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात : शरद पवार 

उमेश घोंगडे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

`पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात. त्यांच्या शिस्तीची खासदारांना धास्ती असते. मात्र ते परदेशात गेले, की त्यांचे खासदार माझ्याभोवती गर्दी करतात,' हे गुपित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात उघड केले. 

पुणे : `पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप खासदारांना हेडमास्तरसारखे वाटतात. त्यांच्या शिस्तीची खासदारांना धास्ती असते. मात्र ते परदेशात गेले, की त्यांचे खासदार माझ्याभोवती गर्दी करतात,' हे गुपित ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात उघड केले. 

संजय आवटे यांच्या `वुई द चेंज-आम्ही भारताचे लोक' या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, खासदार राजीव सातव, आमदार कपिल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, "भाजप खासदारांच्या संसदेतील उपस्थितीची हजेरी दर दोन तासांनी घेतली जाते. ही यादी `वर' ज्यांच्याकडे पोचवायची तिकडे पोचवली जाते. मग गैरहजर राहणाऱ्या खासदारांना बोलवून सांगितले जाते, की पुढच्या वेळी तुला तिकीट नाही. त्यामुळे भाजप खासदार शाळेतल्या मुलांसारखे संसदेच्या सभागृहात बसून राहतात. पण हीच मंडळी मोदी परदेशात गेले की माझ्याभोवती सेन्ट्रल हॉलमध्ये जमतात.'' 

नोटबंदीसारखे निर्णय ज्या पद्धतीने घाईघाईने घेण्यात आले, त्याचा समाचार घेताना मोदींवर शरद पवार यांनी आपल्या उपरोधिक शैलीत टीका केली. तेव्हा सभागृहात हशा पिकला. 

"नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणी चेहरा नाही, नेतृत्व नाही, अशी चर्चा केली जाते. परंतु 1977 मध्ये अशीच स्थिती होती. त्यावेळी लोकांनी नेता कोण पक्ष कोण हे काहीही न पाहता लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढे आले. निवडणुकीनंतर पक्ष स्थापन झाला. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले,' अशी आठवण पवारांनी सांगितली. ते म्हणाले, की मूलभूत हक्कांवर गदा आल्यास लोक स्वतः निर्णय घेतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख