पुणे शहर शिवसेनेत सामसूम 

पुणे शहर शिवसेनेत सामसूम 

पुणे : केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात शहर पातळीवर राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आक्रमक भूमिका घेऊन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेत मात्र सामसूम आहे. शहरप्रमुख बदलाचे वारे गेल्या तीन महिन्यांपासून वाहात आहे. मात्र प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने शहरातील पक्ष संघटना अगदीच थंड आहे. 

सत्तेत असूनही शिवसेना सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत केंद्र व राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या साऱ्या घटना-घडामोडी मुंबईत ठाकरे यांच्या पातळीवर होत आहेत. पुण्यातील पक्ष संघटना अगदीच शांत आहे. नोटाबंदीच्या विरोधात दोन्ही कॉंग्रेसने राज्यभर तसेच पुण्यात मोठे आंदोलन केले. चोवीस तास पाणी पुरवठ्याच्या विषयावरून महापालिकेतही हे दोन्ही पक्ष आक्रमक आहेत. 

परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आंदोलन केले. पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह 13 जणांना या प्रकरणात अटक करून थेट दरोड्याचे कलम लावण्यात आले. कॉग्रेसच्या पातळीवरदेखील महागाईपासून नोटाबंदीच्या विषयात सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी विविध छोटे-मोठे कार्यक्रम गेल्या दोन महिन्यात घेण्यात आले. या साऱ्या घटना-घडामोडी घडत असताना शिवसेना कुठेच दिसत नाही ही बाब उल्लेखनीय आहे. 

सध्या पक्षाचे शहरप्रमुख माजी आमदार विनायक निम्हण आहेत. मात्र त्यांनी शहरप्रमुखपदाचे काम थांबविण्याची इच्छा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यानंतर नव्या शहरप्रमुखांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून नव्या शहरप्रमुखांची घोषणा प्रलंबित आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर यांची नावे त्यासाठी पुढे आली होती. मात्र पुढे काहीच झाले नाही. या साऱ्या परिस्थितीमुळे संघटना शांत झाली असून पदाधिकारी व पक्ष संघटनेवर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com