pune police decided to stop vehicle movement from 23 March afternoon | Sarkarnama

पुणे पोलिसांचा आजचा मोठा निर्णय़ : वाहनांना बंदी; दुपारी तीनपासूनच वाहतूक पूर्णपणे थांबविणार

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 मार्च 2020

पुण्यातील संचारबंदीचा परिणाम फारसा होत नसून रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे वाहनांची वाहतूक थांबविण्याचा निर्णय़ पुणे पोलिसांनी घेतला आहे. 

पुणे : पुणेकरांना आता पूर्णवेळ घरातच थांबावे लागणार आहे. पुणेकरांना वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक थांबणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पुण्याचे पोलिस आय़ुक्त के. व्यंकटेशम यांनी आज सकाळी याबाबत एका ट्विटला उत्तर देताना या बंदीचे सूतोवाच केले होते. `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी यास दुुजोरा दिला.

यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह, ओला, उबर अशा सेवाही बंद होतील. नागरिकांना त्यांची वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. 

राज्यातील नागरी भागांत संचारबंदी सुरू असली तरी अनेक ठिकाणी वाहतूक सुरू आहे. लोकांनी संचारबंदी पूर्णपणे मनावर न घेतल्याने पोलिसांना हे पाऊल उचलावे लागत आहे. आधी संध्याकाळपासून हा निर्णय घेतला जाणार होता. आता दुपारी तीन वाजताच त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी संचारबंदीचा आदेश रविवारी रात्रीच काढला होता. त्यामध्ये कोणत्याही कारणासाठी नागरीकांना शहरामध्ये फिरता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार, रविवारी शहरामध्ये "जनता कर्फ्यु'ला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, दिवसभर शहरामध्ये शांतता होती, मात्र कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी नागरीक सायंकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते. त्यात काहींनी ढोल वाजविले. काहींनी गरबा खेळला. वाहने बाहेर काढण्यात आली. त्यामुळे शहरात पुन्हा नागरिक गटागटाने काही ठिकाणी दिसून आले. या उत्साहामुळे जनता कर्फ्यूचा मूळ उद्देशच धोक्यात आला असता.  असा प्रकार पुन्हा घडू नये, यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर, यांनी रविवारी रात्री नऊ ते 31 मार्चपर्यंत नागरीकांनी बाहेर पडू नये, यासाठी फौजदारी दंड संहिता अंतर्गतच्या 144 कलम लागू केला आहे. त्यात आता वाहनांचाही समावेश आहे. शहरातील नागरीकांनी कोणत्याही कारणास्तव रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार करण्यास, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे व रेंगाळणे या सर्व कृत्यास मनाई करण्यात आली आहे. त्यातून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख