राहुल आवारे कुस्तीच्या मैदानातून पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या आखाड्यात!  

कुस्तीपटू राहुल आवारे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करुन उद्या ग्रामीण पोलिस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू होत आहेत.
राहुल आवारे कुस्तीच्या मैदानातून पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या आखाड्यात!  
wrestler rahul aware joining pune rural polce as dysp

पुणे : कुस्तीच्या मैदानात विरोधी मल्लांना चितपट करणारे कुस्तीपटू राहूल आवारे उद्या (ता.3) पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) म्हणून रुजू होत आहेत. बीडमधील पाटोद्याजवळील एका छोट्याशा खेड्यातुन पुण्यात येऊन राहूल आवारे यांनी कुस्तीचे धडे गिरविले. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्य, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत कांस्य, रौप्य पदक पटकाविले आहे. 

राहुल आवारे यांनी 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2019 ला कझाकस्तानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक मिळविले होते. त्यापाठोपाठ आशियायाई स्पर्धेमध्ये दोन कांस्य व एक रौप्य पदक मिळवण्याची कामगिरी त्यांनी केली होती. आवारे यांच्या या कामागिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मान केला होता. 

राज्य सरकारनेही राहुल आवारे यांच्या कुस्तीमधील कार्याची दखल घेऊन त्यांना पोलीस दलामध्ये थेट पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती केली. एक वर्षापूर्वी त्यांचे नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण सुरू झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उद्यापासून (ता.3) पुणे पोलीस दलात डीवायएसपी म्हणून रुजु होत आहेत. 

बीडमधील पाटोद्याजवळील पथारी या गावातील एका शेतकरी कुटुंबात राहूल आवारे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाळासाहेब आवारे हेही राज्यपातळीवरील कुस्तीपटू होते. वयाच्या सातव्या वर्षापासून वडिलांनी राहुल व त्यांचा भाऊ गोकुळला कुस्तीचे धडे देण्यास सुरूवात केली. नंतर वडिलांनी राहुल यांना कुस्ती खेळण्यासाठी पुण्याला पाठविले. ते 2004 पासून भवानी पेठेतील गोकुळ वस्ताद तालमीमध्ये "रुस्तम-ए-हिंद' हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवू लागले. बिराजदार यांच्या निधनानंतर 2012 पासून पहिलवान काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कात्रज-आंबेगाव येथील तालमीमध्ये त्यांनी कुस्ती खेळण्यास सुरूवात केली. 

आवारे हे मागील एक वर्षापासून कुस्ती खेळणाऱ्या आठ मुलांचा खर्च करत आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी अनेक गोरगरीबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मदतही करीत आहेत. याबद्दल ते म्हणतात की, मी स्वतः गरीब कुटुंबातुन पुढे आलो, गरिबीचे चटके सहन केले. त्यावेळी मला अनेकांनी मदत केली, ते ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. 

लहान असल्यापासूनच पोलीस दलातील नोकरीचे आकर्षण होते. कुस्ती खेळाकडे वळलो, त्यावर प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तोच प्रामाणिकपणा, कष्ट आणि धाडसाच्या आधारावर पोलीस अधिकारी म्हणून काम करु. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याकडे आपला कायम कल असेल, असे राहुल आवारे यांनी म्हटले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in