वळसे-पाटील अन् आढळरावांच्या आवडत्या करंदीत सरपंचबाईंनी दाखवला हिसका

ग्रामपंचायतीने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मेल करुन कळविले होते.
वळसे-पाटील अन् आढळरावांच्या आवडत्या करंदीत सरपंचबाईंनी दाखवला हिसका
The woman sarpanch and other members demolished the distillery

शिक्रापूर : गावचे पोलिस पाटील ते जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यापर्यंत तब्बल पाच वर्षे तक्रार करुनही गावठी दारु भट्टी बंद झाली नाही. त्यामुळं अखेर शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या महिला सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत ही दारु भट्टी उध्वस्त केली. तसंच भट्टी चालविणारांना अक्षरश: पाठलाग करुन हुसकावून लावलं. करंदी (ता.शिरूर) हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातील असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दत्तक घेतले होते. (The woman sarpanch and other members demolished the distillery)
             
करंदी व पिंपळे-जगताप (ता.शिरूर) या गावांदरम्यान सुरू असलेल्या दारु भट्टीबाबत स्थानिक ग्रामपंचायतीने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मेल करुन कळविले होते. मात्र दोन महिने होऊनही कारवाई होत नसल्याने करंदी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीतच हा विषय चर्चेला घेण्यात आला. सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले व उर्वरित सर्व सदस्य एकत्र आले. त्यांनी गावातील इतर पदाधिकाऱ्यांसह जाऊन दारुभट्टीवर धाड टाकत ती उध्वस्त केली. शिवाय तयार दारुचे बॅरल जेसीबीने मोडून टाकीत भट्टीचे कच्चे साहित्य पेटवून दिले.    

या कारवाईत सरपंच व उपसरपंचांसह सदस्या शोभा दरेकर, सुनिता ढोकले, रेखा खेडकर, सोनाली ढोकले, पांडूरंग ढोकले, शिवाजी दरेकर, संदीप ढोकले, नितीन ढोकले, अंकुश पंचमुख, ग्रामसेवक दिलीप पानसरे तसेच गावातील जेष्ठ पदाधिकारी माजी सभापती शंकर जांभळकर, गोरक्ष ढोकले, अशोक ढोकले, सचिन दरेकर, बापू दरेकर, सुनिल ढोकले, प्रविण झेंडे, विशाल खरपुडे तसेच युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी ढोकले, पिंपळ्याचे उपसरपंच सागर शितोळे, सदस्य स्वप्निल शेळके यांनीही सहभाग घेतला. 

दरम्यान, ही कारवाई पोलिसांना कळावी म्हणून पोलिस नाईक अजितनाथ शिंदे व पोलिस कर्मचा-यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी शेवटच्या टप्प्यातील कारवाई केली.दारु भट्टी सुरू ठेवणा-या अज्ञातांविरोधात शिक्रापूर पोलिसांनी बेकायदा दारु बनविणे व विक्रीचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा तपास करुन ते ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

करंदी गृहमंत्री वळसे-पाटील व आढळरावांच्याही जवळची

२०१४ मध्ये आदर्श सांसदग्राम म्हणून तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव यांनी करंदी हे गाव दत्तक घेतले होते. गावात सुमारे दहा कोटींची कामेही या दरम्यान झाली. मात्र लोकसभेच्या निवडणूकीत आढळराव यांना या गावाने मतदानात पिछाडी दिली. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यासाठी सर्वाधिक ऊस पूरवठा करणारे गाव म्हणून करंदीचा नावलौकीक आहे. या शिवाय गावात राष्ट्रवादीची सत्ता आहे. गृहमंत्र्यांच्या मतदार संघातील गाव असूनही गावचे पोलिस पाटील ते पोलिस अधिक्षक गावठी दारुच्या तक्रारींबाबत गंभीरपणे दखल घेत नसल्याने संपूर्ण करंदीतच आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in