अडीच लाखांच्या लाचप्रकरणी महिला न्यायाधीशास अटक; आणखी दोन न्यायाधीशांची नावे आली समोर

लाचखोरीच्या ट्रॅपनंतर अडीच महिन्याने ही अटक झाली, हे विशेष.
अडीच लाखांच्या लाचप्रकरणी महिला न्यायाधीशास अटक; आणखी दोन न्यायाधीशांची नावे आली समोर
Woman judge arrested for accepting bribe of Rs 2.5 lakh .jpg

पिंपरी : खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी महिला मध्यस्थामार्फत अडीच लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वडगाव मावळ (जि. पुणे) न्यायालयातील न्यायाधीश अर्चना दिपक जतकर यांना अखेर एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पुणे युनीटने गुरुवारी अटक केली. त्यांना ५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे येथील विशेष न्यायालयाने दिले आहेत. लाचखोरीच्या ट्रॅपनंतर अडीच महिन्याने ही अटक झाली, हे विशेष.

एका पीआयचा (पोलिस निरीक्षक) त्यात सहभाग आढळल्याने त्याला अगोदरच निलंबित करण्यात आले आहे. तर, आता न्यायाधीशालाच अटक झाल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती व्यापक बनली आहे. लाचखोरीच्या इतर प्रकरणासारखे हे प्रकरण नव्हते. न्यायाधीशच त्यात संशयित आरोपी असल्याने ते मोठे गंभीर व नाजूक बनले होते. त्यामुळे त्यात पुरेसा पुरावा हाती लागल्यानंतरच एसीबीने न्यायाधीशांना अटक केली.

जतकर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी असलेले वडगाव मावळ कोर्ट मॅनेज करून देण्यासाठी शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता,. मावळ) या तरुणीला १३ जानेवारी रोजी अडीच लाख रुपयांची लाच घेताना तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे एसीबीने पकडले होते. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केलेल्यांविरुद्ध एक खटला वडगाव मावळ कोर्टात जतकर यांच्यासमोर प्रलंबित होता. त्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.

न्यायालयातही दलाल घुसल्याचे हे गंभीर प्रकरण समोर आल्याने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. या गुन्ह्याच्या तपासात जतकर यांच्या वतीने ही लाच घेण्यात आल्याचे समजल्याने त्यांनाही नंतर आरोपी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांना तो मिळाला नव्हता. गायकवाड या आणखी दोन न्यायाधीशांसाठी काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, एसीबीने तपासात त्यांच्याविरुद्धचा फास आणखी आवळला. भक्कम पुरावे गोळा केले आणि त्यांना अटक केली. एसीबीच्या तपासात जतकर यांच्यासाठी काम करणाऱ्या गायकवाडने जतकर यांच्यासमोर प्रलंबित खटल्यातील सात आठ आरोपींशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर आणि त्यांच्याविरुद्ध एसीबीत तक्रार केलेल्या तक्रारदारात तब्बल १४७ वेळा मोबाईलवर संभाषण झाल्याचेही दिसून आले आहे. त्यात मी काम करुन देते असे संभाषण जतकरांनी आरोपीशी केल्याचा व्हाईस रेकॉर्डचा मजबूत पुरावा एसीबीने मिळवला आहे. 

जतकर यांच्या मोबाईलचा सीडीआरच त्यांनी काढला असून त्यातून हा पुरावा त्यांच्या हाती आला आहे. आपल्या मोबाईलचे सीम स्वताच्या नावावर न ठेवण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती. मुंबईतील समता कुबडे यांच्या नावाने ते सीम होते. एसीबीने कुबडे यांचा जबाब नोंदवला असून त्यांनी जतकरांना ते वापरत असलेल्या सीमच्या जोडीने आणखी एक सीम दिल्याची कबुली दिली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in