लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली ही ठाणी 21 फेब्रवारीपासून पुणे पोलिस आयुक्तालयात

पुणे ग्रामीणच्या हद्दीतून मोठा परिसर पुणे पोलिसांकडे
लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली ही ठाणी 21 फेब्रवारीपासून पुणे पोलिस आयुक्तालयात
police bandobast

उरुळी कांचन (पुणे) : पुणे शहरानजिकच्या  लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलिस ठाण्यांचा समावेश 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून (ता. 21 फेब्रुवारी) ग्रामीण पोलिस दलातून शहर पोलिसांकडे होणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा पोलिस दलात उरुळी कांचन या पोलिस ठाण्याची नव्याने निर्मिती होणार आहे. 

याशिवाय शहर पोलिस दलातील हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगीसह शहर पोलिस दलातील पाचहुन अधिक पोलिस ठाण्याचे विभाजन करुन, नव्याने कांही पोलिस ठाण्याची निर्मितीही करण्याबाबतची अंमलबजावणी याच दिवसापासून होण्याची शक्यता आहे.

लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलिस ठाण्यांचे शहर पोलिसांकडे हस्तांतर 21 फेब्रुवारीपासूनच होणार असल्याच्या वृत्तास जिल्हा  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

देशमुख यांनी रविवारी (ता. 14) रात्री अचानक लोणी कंद पोलिस ठाण्यातील 58 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या आहेत. त्या सर्वांना 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपुर्वी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी या पोलिस ठाण्याचा चार्ज त्यानंतर घेतील.  लोणीकंद पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्याप्रमानेत लोणी काळभोर व हवेली पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे अर्ज यापूर्वीच भरुन घेतले आहेत.  

गृहविभागाकडून लोणी काळभोर व हवेली पोलिस ठाण्याबाबतच्या निर्णयाची वाट पहात असुन, वरील दोन्ही पोलिस ठाण्याबाबतचा आदेशही पुढील एकदोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या आदेशानंतरच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा कारभार शहर पोलिसांकडे सोपविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

या सर्व प्रक्रियेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनीधी व पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱी यांची संयुक्त बैठक तीन जानेवारीला मंत्रालयात पार पडली होती. या बैठकीत खुद्द अजित पवार यांनी वरील सहा पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच, लोणी काळभोर व लोणी कंद व हवेली पोलिस पोलिस ठाण्याचा कांही भाग शहर पोलिसात सामाविष्ट करण्याबाहतचे आदेश दिले होते. यामुळे संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष या आदेशाच्या अंमलबजावणीकडे होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in