चौपदरीकरणाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्याच्या श्रेयावरून कलगीतुरा रंगला आहे.
चौपदरीकरणाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली
Shrirang Barne and Amol Kolhe took credit for the quadrangle work

पिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता मिळते नाही, तोच त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत श्रेयाचा कलगीतुरा रंगला आहे. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके व आपल्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश असल्याचे काल (ता.२८) शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.२९) लगेच मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजूरी मिळाल्याचा दावा पत्रक काढून  केला. (Shrirang Barne and Amol Kolhe took credit for four lane work)

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये हे काम सुरु होणार आहे. कधी ते पूर्ण होईल, हे सांगता येत नाही. तरीही त्याअगोदरच राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत त्याच्या श्रेयावरून कलगीतुरा रंगला आहे. ५४ किलोमीटरच्या या रस्त्याचे काम बीओटी तत्वावर होणार असून त्यासाठी एक हजार १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. बीओटीवरील हे काम असल्याने त्यासाठी टोल द्यावा लागणार आहे. 

या कामाला मंजूरी मिळताच लगेच कालच कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर बारणेंनीही गडकरींची आज भेट घेऊन या कामाला मान्यता दिली म्हणून त्यांचे आभार मानले. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरु होत असलेला तळेगाव-चाकण-शिक्रापूर  हा राष्ट्रीय महामार्ग  बांधा, वापरा आणि हस्तांतर करा ('बीओटी') तत्वावर  विकसित करण्यात येणार आहे. 

या कामाला गती देण्यासाठी गडकरींकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता, असे बारणे म्हणाले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गडकरींनी या कामास मान्यता दिल्याने त्यांनीही आज (गुरुवारी) गडकरींची दिल्लीत भेट घेऊन आभार मानले. याबाबत ते म्हणाले, चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त  आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर पूर्वी राज्य मार्ग होता. त्याला राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी म्हणून केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याबाबत 16 मार्च 2016 रोजी गडकरींशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले. त्याला राजमार्ग म्हणून घोषित केले.

राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला. परंतु, भूसंपादनाची कारवाई, त्यासाठी लागणारा निधी पाहता त्याला विलंब होणार होता. काम होणेही शक्य नव्हते. त्यामुळे महामार्ग 'बीओटी' तत्वावर  विकसित करण्याचा डीपीआर तयार करण्यात आला. अतिगर्दी होणा-या तळेगाव दाभाडेमध्ये दोन किलोमीटर 'ओव्हर ब्रीज', तर चाकण म्हाळुंगे एमआयडीसी चौकात अंडर पास या कामात केला जाणार आहे, असे बारणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in