पैसे गोळा करणाऱ्या शिवसेना नेत्याचे नाव बड्या पुढाऱ्याने पक्षाच्या ग्रुपवर फोडले.... - shivsena leader announces names of sena leader who were collected money | Politics Marathi News - Sarkarnama

पैसे गोळा करणाऱ्या शिवसेना नेत्याचे नाव बड्या पुढाऱ्याने पक्षाच्या ग्रुपवर फोडले....

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 20 जानेवारी 2021

पुणे शिवसेनते उलटसुलट चर्चा!

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास अद्याप कालावधी असताना शहर शिवसेनेमध्ये मात्र एकमेकांविरोधात रणशिंग फुंकण्यास सुरवात झाली आहे. आगामी निवडणुकीत उमेदवारी देतो म्हणून आतापासूनच पैसे गोळा करणाऱ्या नेत्याचे नाव जिल्ह्यातील एक नेत्याने सोशल मिडीयावर जाहीर केल्याने आणखी खळबळ उडाली. एवढेच नव्हे, हा पैसे जमा करणारा नेता कोणाचा "पंटर' आहे, त्या नेत्यांचे नावदेखील उघड केल्याने बुधवारी दिवसभर शहरात हा चर्चेचा विषय झाला होता.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी दोन दिवसांपूर्वी पक्षाचे नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात शिवसैनिकांनी नेत्यांच्या कामकाजाबाबत रोखठोक सवाल केले होते. त्यातच पक्षाचे एक नेते आगामी निवडणुकीत तिकीट देतो, असे आश्‍वासन देऊन पैसे गोळा करीत असल्याची जोरदार चर्चा शिवसेनेत सुरू आहे. त्याबाबतचे वृत्त `सरकारनामा`मध्ये आज प्रसिद्ध झाले. त्यावरून शिवसेनेच्या सोशल मिडीयावरील ग्रुपमध्ये जिल्ह्यातील एका नेत्याने थेट पैसे जमा करणाऱ्या "त्या' नेत्याचे नाव जाहीर केले आणि दिल्लीतील पक्षाच्या कोणत्या नेत्याचा तो "पंटर' आहे, हे जाहीर केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

जिल्ह्यातील बड्या नेत्याने सोशल मिडीयावरच हे नाव जाहीर केल्याने त्यातून वाद निर्माण होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्या नेत्याला फोन करून, ते नाव काढून टाकण्याची विनंती पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने केली. झालेली चूक लक्षात आल्याने जिल्ह्यातील त्या नेत्याने सोशल मिडीयावरून तो मेसेज लगेचच डिलीट केला. त्यातून शहर शिवसेनेत दिवसभर उलटसुलट चर्चा रंगली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख