आगाऊपणा नको, जेवढी स्क्रिप्ट तेवढेच बोला! आढळराव अन् अमोल कोल्हेंमध्ये जुंपली - shivajirao Adhalrao Patil slams MP Amol Kolhe over controvercial comment | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आगाऊपणा नको, जेवढी स्क्रिप्ट तेवढेच बोला! आढळराव अन् अमोल कोल्हेंमध्ये जुंपली

राजेंद्र सांडभोर 
रविवार, 18 जुलै 2021

शरद पवार, दिलीप  वळसे पाटील व दिलीप मोहितेंवर वयावरून टीका करणार का? असा सवाल करून आढळराव यांनी उपस्थित केला.

राजगुरूनगर (जि. पुणे) : आपसातल्या भांडणात खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी ठाकरे, पवार यांना मधे आणण्याचे कारणच नव्हते. या नेत्यांवर बोलण्याइतकी कोल्हेंची उंची नाही. हे म्हणजे कोल्ह्याने उंटाचा मुका घेण्यासारखे आहे, असा पलटवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. पुणे जिल्ह्यात फक्त खासदार कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते या दोघांमुळेच महाविकास आघाडीत बिघाडी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Shivajirao Adhalrao Patil slams MP Amol Kolhe over controvercial comment)

खेड घाट बाह्यवळणाचे उद्धाटन खासदार कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले. त्यावेळी आढळरावांवर, कोल्हे व मोहिते यांनी सडकून टीका केली. त्या टीकेला आज ( रविवारी ) आढळरावांनी पत्रकार परिषद घेऊन, कागदपत्रे दाखवत प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीत बिघाडीला कोल्हेंनी सुरुवात केल्याचे आढळराव यांनी सांगितलं.

हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा!

खेड घाटाच्या कामाची सर्व प्रक्रिया माझ्या पाठपुराव्यामुळे झाली. मधे लोकसभा निवडणूक आणि पावसाळा आला. ठेकेदाराच्या कागदपत्रांची पूर्तता उशिरा झाल्याने फक्त कार्यादेश यांच्या काळात निघाला. असे असतानाही बाह्यवळणाच्या उद्घाटनासाठी साधा फोन करण्याचा शिष्टाचार पाळला गेला नाही. माझे जाऊद्या मुख्यमंत्र्यांचा साधा फोटो पोस्टरवर लावला नाही. ज्या उद्धवजींनी कोल्हेंना राजकारणात आणून ओळख दिली, त्यांच्याबद्दल तरी अदबीने बोलावे. एकट्या कुणाहीमुळे नाही, तर शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे या तिघांमुळे सत्ता आहे. ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळेच तुम्ही सत्तेची फळे चाखता, हे लक्षात ठेवा. आगाऊपणा करू नका. जेवढी स्क्रिप्ट तेवढेच बोला, अशा शब्दांत आढळराव यांनी कोल्हेंवर टीका केली.

माझ्या वयावर बोलले गेले. मी तर फक्त ६५ वर्षांचा आहे. मग उद्या शरद पवार, दिलीप  वळसे पाटील व दिलीप मोहितेंवर वयावरून टीका करणार का? असा सवाल करून आढळराव म्हणाले, तुम्ही एवढे तरुण होतात, तर कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात, कोंबडीसारखे घरात का बसलात? त्यावेळी मी मतदारसंघात फिरत होतो. तुम्हाला लोकांनी शूटिंग करायला निवडून दिले आहे का? खासदाराला अडीच लाख पगार असतो, तरी चूल पेटत नाही म्हणे. 

हेही वाचा : नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला!

बैलाचा समावेश जंगली प्राण्यांमध्ये ज्या समितीने केला, त्या समितीत शरद पवार, प्रणव मुखर्जी, जयंती नटराजन, असे नेते होते. याचा अभ्यास न करता, मठ्ठपणे माझ्यावर टीका करतात. खेड घाट बाह्यवळणाचा मार्ग बदलला असेल, तर तुम्हीच खासदार आमदार आहात, माझी चौकशी करा. पुरावे द्या. हवेत बोलू नका. सर्वेक्षण होते. त्यानुसार रस्ता होतो. एवढे सुद्धा कळत नाही, असे आढळराव म्हणाले. 

रेल्वे म्हणजे काही वडापाव नाही, लगेच तयार व्हायला. कलमाडींनी सर्वेक्षण केले होते, पण व्यवहार्य नसल्याने ते बाजूला ठेवले गेले. मीही २००६ व २०१२ साली पाठपुरावा करून सर्वेक्षण करून घेतले, तेही उत्पन्न तोट्यात दिसल्याने रद्द झाले. पुन्हा २०१६ ला सर्वेक्षण केले गेले. केंद्र व राज्य दोघांनी प्रत्येकी ५० टक्के खर्चाला मान्यता दिली व २०१७ साली दोघांची मिळून महारेल कंपनी स्थापन झाली. त्यानंतर २०१८ साली डीपीआर झाला. त्याचा सर्व पत्रव्यवहार माझ्याकडे आहे, असेही आढळराव यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख