खासगी रुग्णालयांचा कोरोनावरील बिलांचा आकडा ऐकून शरद पवारही चकित

खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्‍क आकारणी होणार नाही यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या.
खासगी रुग्णालयांचा कोरोनावरील बिलांचा आकडा ऐकून शरद पवारही चकित
sharad-pawar-corona meeting pune

पुणे : पुण्यातील कोरोना साथीच्या स्थितीचा आढावा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतला. यातील उपचारांच्या बिलांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालये असहकार्य करत असल्याच्या तक्रारींवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्याची सूचना त्यांनी केली. 

प्रतिबंधीत क्षेत्राचाही नियमित आढावा घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी  अवाजवी शुल्‍क आकारणी  होणार नाही यासाठी  आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही ते म्‍हणाले. शेतकरी वर्गासाठी बाजारभाव, हवामानाची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे देण्यात येते. त्यानुसार करोना संदर्भातील किती रुग्ण आणि कोणत्या रूग्णालयात किती बेड शिल्लक आहे. बाबतची प्रत्येक गोष्टीची माहिती नागरिकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. अनेक लोपप्रतिनिधींनी खासगी रुग्णालयांची प्रचंड बिले येत असल्याचा मुद्दा मांडला. तो आकडा ऐकून पवारही चकीत झाले आणि ते रोखण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना विषाणूच्या साथीच्या पुण्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला.

अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच  अधिकाऱ्यांनी त्‍यांना  नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. ते म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबई महानगरपालिकेने खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेतली आहेत. त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत,  त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस्, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
    

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in