हनीट्रॅप भोवला! : आमदार काकाने पुतण्याचा राजकीय काटा पूर्णपणे काढला.....

शैलेश मोहिते यांची राष्ट्रवादीतून निलंबन
हनीट्रॅप भोवला!  : आमदार काकाने पुतण्याचा राजकीय काटा पूर्णपणे काढला.....
shailesh-dilip mohite

पुणे : राजकारणात सावज टप्प्यात आले की त्याचा करेक्ट कार्यक्रम हा ठरलेला असतो. अशाच घडामोडी गेल्या आठवडाभरात खेड तालुक्यात घडला. खेड-आळंदीचे पक्षाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना हनीट्रँपमध्ये अडकवण्याच्या गुन्ह्यातील आरोपी आणि पक्षाच्या युवक शाखेचा राष्ट्रीय सरचिटणीस शैलेश मोहिते याचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

आमदार दिलीप मोहिते यांना हनीट्रपमध्ये अडवकवून त्यांची बदनामी करण्याचा कट रचल्याबद्दल आणि इतर गुन्हेगारी कृत्यात समावेश असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाच सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच पक्षविरोधी कारवाय केल्याचाही ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दिलीप मोहिते यांचा पुतण्या असलेला शैलेश हा राष्ट्रवादी युवकच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी होता. पक्षातूनच हकालपट्टी झाल्याने हे पदही आपोआप जाण्याची चिन्हे आहेत. शैलेश हा दिलीप मोहिते यांचे कधी काळी उजवेा हात होता. दोघांनी मिळून खेड तालुक्यात 2004 ते 2014 पर्यंत सत्ता गाजवली. पोलिस स्टेशन, सरकारी कार्यालये येथे शैलेश यांचा शब्द काकांची सत्ता असताना मानला जात होता. त्यातून पक्षातील काही मंडळी नाराज झाली. त्यामुळे दिलीप मोहिते यांचा 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला. दोघांच्या भांडणाला याच काळात सुरवात झाली. ही भांडणे एवढी वाढली की काकांना हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी पुतण्याने कट रचल्याबद्दल गुन्हा साताऱ्यात दाखल करण्यात आला. या ट्रॅपसाठी जी महिला निवडली होती तिनेच ही माहिती दिलीप मोहिते यांच्या जवळच्या दुसऱ्या पुतण्याला सांगितल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शैलेश आणि राहुल कांडगे या दोघांवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातून न्यायालयातून जामीन मिळताच याच महिलेने शैलेश आणि कांडगे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

हनीट्रॅपचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलेश याच्या पक्षातून हकालपट्टीसाठी आमदार समर्थकांनी बाजू लावून धरली होती. शैलेश याला पक्षातील काही नेतेमंडळी पाठबळ देत असावीत, अशी शंका खुद्द मोहिते यांनी बोलून दाखवली होती. मोहिते यांच्या मागणीनंतर पक्षाने ती मान्य करत शैलेश यांच्यावर कारवाई केली. आमदार मोहिते हे आपल्या विरोधकाला सहसा मोकळे सोडत नाहीत. टप्प्यात आला की त्याचा कार्यक्रम करण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. त्यानुसार त्यांनी पुतण्याला राजकीय खेळीतून पूर्णपणे बाद केल्याचे आज शिक्कामोर्तब झाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in