संजय राऊतांचा पुण्यात येऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर राजकीय बाॅम्ब

राऊतांनी राष्ट्रवादीच्या आमदारावर जोरदार टीका केली.
संजय राऊतांचा पुण्यात येऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर राजकीय बाॅम्ब
sanjay raut

पुणे : शिवसेनेचे नेते, खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवस पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अशी काही विधाने केली की त्यातून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या आघाडीतील पक्षांनीच धसका घ्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली.  (Shivsena MP Sanjay Raut criticizes NCP in Pune district) 

खेड तालुक्यातील पंचायत समितीत चार दिवसांपूर्वी राजकीय नाट्य घडले. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य फुटले आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला. त्यातून सदस्यांना मारहाण, गोळीबार असे प्रकार घडले. या अविश्वास ठरावाला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांचा पाठिंबा असल्याचा स्थानिक शिवसेना नेत्यांचा आरोप होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहितेंना काळी बुरशी म्हणून टीका केली. तरी अविश्वास ठराव मंजूर झाला आणि शिवसेनेलाच तेथे मानहानी पत्करावी लागली.

या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेैनिकांना दिलासा देण्यासाठी राऊत हे खेडमध्ये गेले. त्यांनी मोहिते यांच्यावर जोरदार आगपाखड केली. मोहितेंना माजी आमदार करणार, त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, ते विकृत नेते आहेत, अशे शेलकी वाक्ये त्यांनी वापरली. तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे हे वागण आपण शरद पवारांच्या कानावर घालणार असल्याचाही त्यांनी इशारा दिला. खेडमधील त्यांच्या वक्तव्याने खुद्द मोहिते यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि राऊत यांनी अपुऱ्या माहितीवर हे आरोप केल्याचा दावा केला.

खेडमधील दौरा आटोपून राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. राऊतांकडे शिवसेनेेची पुणे जिल्ह्याची जबाबदारी देखील आहे. त्यामुळे साहजिकच आगामी महापालिका निवडणुकीविषयी प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा राऊत यांनी केली. ते एवढ्यावरत थांबले नाहीत. इतक्या जागा मागण्याचे कारणही त्यांनी सांगितले. शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचं लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेच्या प्रभागांची संख्या ही सध्या 163 आहे. त्यात आणखी पाच ते सात जागांची भर पडण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेने आताच निम्म्या जागा मागितल्याने काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शिवसेनेचे नगरसेवक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेह नाही. सेनेने निम्म्या जागा मागितल्यानंतर महाविकास आघाडी कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

अर्थात आधीच जागा जादा मागायच्या आणि नंतर वाटाघाटीच्या वेळी त्यात तडजोड करायची, अशी प्रत्येक पक्षाची रीत असते. त्यामुळे सेनेने इतक्या जागांवर दावा ठोकणे त्या रणनीतीचा भाग असू शकतो. तीन पक्षांत जागावाटप होणार आहे. राष्ट्रवादीची ताकद महाआघाडीतील तीन पक्षांत पुण्यात अधिक आहे. काॅंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता तिसऱ्या क्रमांकावरील सेनेनेच जोरदार मागणी केल्याने वाटाघाटींच्या वेळी आणखी रंगत येणार, हे मात्र राऊत यांच्या विधानाने स्पष्ट झाले.   

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in