पिंपरी : कोरोनाची पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येकाने जबाबदारीने वागा. अन्यथा काही दिवसात बेड मिळणे मुश्किल होईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे महापालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी आज दिला. दरम्यान, कोरोनाची ही दुसरी मोठी लाट रोखण्यासाठी त्याचे सुपरस्प्रेडर असलेल्या २५ हजारजणांचे उद्या (ता.५) लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.आज सुटीचा दिवस असूनही शहरातील लसीकरण केंद्रे सुरुच होती.
दरम्यान, वरील इशारा देणारे श्रीमंत महापालिकेच्या आयुक्तांचे पहिलेच फेसबुक लाईव्ह तांत्रिकदृष्ट्या अपयशी ठरले. आयुक्तांचे मोजके भाषण आणि आवाहन आवाज खूपच कमी व अस्पष्ट असल्याने पोचलेच नाही.पालिका पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.शहरातील कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने आयुक्तांनी सकाळी साडेदहा वाजता दहा मिनिटांचे मोजके, आटोपशीर असे हे फेसबुक लाईव्ह केले. त्यात त्यांनी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शहरात सध्या रुग्णालयापेक्षा घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या पाचपट म्हणजे १७ हजार १६० आहे.
त्यांच्यामार्फत आणि दुकानदार, चालक, वाहक, शिक्षक, सुरक्षारक्षक अशा सुपरस्प्रेडरमार्फत कोरोना अधिक पसरण्याचा धोका अधिक असल्याने त्यांनी जास्त काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले. अशा २५ हजार सुपरस्प्रेडर्सचे उद्या लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेला वेग देण्यासाठी आणि ज्येष्ठांच्या सोईकरिता त्यांची ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेषत: तरुणाई कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
कोराना लाईटली घेऊ नका, असे पाटील म्हणाले. होम आयसोलेनमधील काहीजण बिनधास्त बाहेर फिरत असल्यानेही कोरोना वाढत असल्याचे पालिकेचे निरीक्षण आहे. दरम्यान, सलग चौथ्याा दिवशी काल (ता.३) शहरात दोन हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले. काल हा आकडा तीन हजाराच्या घरात (२,८३२) इतका होता. एका दिवसात १७ जणांचे जीवही घेतले.

