रेमडिसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकासोबत पार्टी फौजदाराला महागात पडली..... - party with relatives of accused heavily cost to police sub inspector | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडिसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकासोबत पार्टी फौजदाराला महागात पडली.....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकाराबद्दल कठोर कारवाई करत अशा चुकारांना योग्य तो धडा दिला आहे. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबितही करण्यात आले आहे. 

पुणे : रेमडेसिव्हीर बेकायदेशीरीत्या विक्रीविरोधात राज्यातील पोलिसांनी मोहीम राबवलेली असताना त्यास गालबोट लावण्याचे काम काही पोलिसांकडून होत असल्याचे दिसून आले आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी अटक केेलेल्या आरोपींच्या नातेवाईकांसोबत पार्टी करणे एका पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच भोवले आहे. त्याने केवळ पार्टी केली नाही तर पार्टीच्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचाही प्रकार त्याने केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध `पाॅस्को`सारखा कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकाराबद्दल कठोर कारवाई करत अशा चुकारांना योग्य तो धडा दिला आहे. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबितही करण्यात आले आहे. 

दीपक माने असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध 21 वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक माने हा गुन्हे शाखेच्या युनीट चारमध्ये कार्यरत होता. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट चारच्यावतीने बालेवाडी परिसरात दोन भावांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन बेकायदेशीररीत्या विकताना पकडले होते.

तपासादरम्यान, मानेची आरोपीच्या नातेवाईकांशी ओळख झाली होती. दरम्यान, माने 20 एप्रिलला आरोपींच्या नातेवाईक व फिर्यादीच्या दाजीच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी गेला होता. तेथे माने व फिर्यादीचा दाजी दारु पित बसले होते. अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने फिर्यादी व फिर्यादीच्या 16 वर्षीय बहिणीला तेथे बोलावून घेतले. माने याने मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लिल वर्तन करून तिची छेडछाड काढली. तसेच सर्वांना आरोपी करतो, अशी धमकी दिली.

या घटनेची माहिती एका महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास दिली. त्यानंतर दाखल तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये माने हा दोषी आढळल्याने त्यास तत्काळ निलंबीत करण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

नगरसेविकेच्या मुलालाही दुसऱ्या प्रकारात अटक

पिंपरी-चिंचवडमधील अपक्ष नगरसेविका साधना अंकुश मळेकर यांचा मुलगा वैभवसह त्याच्या मित्राला पुणे पोलिसांनी रेमडिसिविरचा काळाबाजार करीत असल्याच्या आरोपावरून नुकतीच (ता.२४) अटक केली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.या दोघांनाही दोन दिवसांची म्हणजे आजपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

शुभम नवनाथ आरवडे (वय़ २२, रा. चिंचवड) असे दुसऱ्या संशयिताचे नाव आहे.या दोघांकडून दोन रेमडीसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल आणि २२ डमी नोटा असा ऐवज जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खडकीतील रुग्णालयाबाहेर ते विनापरवाना, विनाप्रिस्क्रीप्शन,विना कोरोना पॉझीटीव्ह प्रमाणपत्र रेमडीसिवीरसह मिळून आल्याने बेकायदेशीरपणे हे औषध जवळ बाळगल्याबद्दल त्यांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने परवा सापळा लावून पकडले.त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेतील फसवणुकीसह औषध किंमत नियंत्रण कायदा,जीवनावश्यक वस्तू कायदा आणि औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख