नितीन गडकरींचे भव्य-दिव्य स्वप्न : नवीन पुणे हे माळशेज घाटाच्या पलीकडे उभारा..

पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत किंवा पंढरपूर अथवा आळंदीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रोचा सुचविला पर्याय...
नितीन गडकरींचे भव्य-दिव्य स्वप्न : नवीन पुणे हे माळशेज घाटाच्या पलीकडे उभारा..
Nitin Gadkari

पुणे :‘‘पुणे शहरापासून कोल्हापूर, पंढरपूर आदी २५० किलोमीटरपर्यंतच्या तसेच आळंदीसारख्या ठिकाणांसाठी ब्रॉडगेज मेट्रोचे जाळे तयार करणे शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हवी. या मेट्रोचा खर्च प्रती किलोमीटर अडीच कोटी रुपये आहे. या मेट्रोची अंमलबजावणी झाल्यास पुण्यातून कोल्हापूरला अवघ्या अडीच तासांत नागरिकांना पोचता येईल. त्यासाठीचा आराखडा तयार आहे, असे केंद्रीय भूपृष्ठमंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सोमवारी सांगितले.

गडकरी यांनी ‘सकाळ’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यावेळी हायड्रोजन व इथेनॉलसह इंधनाचे बहुविध पर्याय, इथेनॉलचा इंधनातील वाढता वापर आणि त्याचे पंप, तेलबिया क्षेत्रातील देशाचा ‘रोडमॅप’, महाराष्ट्राशी संबंधित पालखी महामार्गासह मेट्रोचे प्रकल्प आदी विषयांवर गडकरी यांनी चर्चा केली. ‘सकाळ’चे समूह संपादक- संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत करून चर्चेचा उद्देश स्पष्ट केला.

आयात इंधनावरील परावलंबित्व कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक महत्त्वाची ठरणार असल्याचा मुद्दा अधोरेखित करून गडकरी म्हणाले, ‘‘पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत किंवा पंढरपूर अथवा आळंदीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो शक्य आहे. आम्ही नागपूरमध्ये दहा मार्गांसाठी ब्रॉडगेज मेट्रो करीत आहोत. नेहमीच्या मेट्रो प्रकल्पासाठी प्रती किलोमीटर किमान ३५० कोटी रुपये खर्च येतो. मात्र, ब्रॉडगेज मेट्रोसाठी अवघा दोन कोटी रुपये प्रती किलोमीटर खर्च आहे. पुणे- कोल्हापूरसाठी सहा किंवा आठ डब्यांची ब्रॉडगेज मेट्रो होऊ शकते. त्यातील दोन डबे बिझनेस तर, चार डबे ‘इकॉनॉमी’ वर्गासाठी असतील. त्यात विमानासारख्या सुविधा मिळतील. त्याचे भाडेही एसटी बसच्या तिकिटाएवढेच असेल.’’

ते म्हणाले, की, नागपूरच्या ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पासाठी सर्व परवाने मिळाले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या धर्तीवर कोणत्या शहराला कोठे प्रकल्प करायचा असेल तर, सर्व प्रकारचे सहकार्य मी करू शकतो. पुणे- कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास वाहतूक मंत्री म्हणून मी त्यांना हवे असलेले सगळे सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी झटपट निर्णय घेऊन कामाला सुरुवात करायला हवी.

नव्या पुण्यासाठी जागा उपलब्ध

पुण्याच्या वाढीला आता मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नवे पुणे तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई-नगर दरम्यान कल्याण माळशेज घाटाच्या पलीकडे २५ लाख लोकसंख्येसाठी नवे पुणे उभारणे शक्य आहे. त्याचा आतापासूनच विचार करण्याची गरज आहे. या प्रक्रियेसाठी काही कालावधी लागू शकतो. परंतु, त्यासाठी आपली दृष्टी हवे, असेही गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.

नगर रस्त्यावर तीन मजली उड्डाण पूल
पुणे - नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाघोली- शिरूर दरम्यान ५० किलोमीटरचा तीन मजली पूल उभारण्यात येणार आहे. तळात आठ पदरी रस्ता, पहिल्या मजल्यावर सहा पदरी पूल, त्यावर मेट्रो धावू शकेल, अशी या पुलाची रचना असेल. त्यामुळे वाहतूक थेट होऊ शकेल. जागतिक दर्जाचा हा प्रकल्प असेल, असे गडकरी यांनी सांगितले. तसेच पुण्याजवळील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पुण्यातून दक्षिणेत जाणारी वाहतूक वळविण्यासाठी मी सुरतपासून नवीन मार्ग आखला आहे. त्यामुळे शहरात होणारी जड वाहतूक कमी होऊन प्रदूषण घटेल, असेही त्यांनी सांगितले.

पालखी मार्गासाठी...
- पालखी मार्गाशी माझी भावनिक जवळीक
- पालखी मार्गाचे दीड वर्षांत उद्‍घाटन होईल
- देहू- पंढरपूर, आळंदी- पंढरपूर मार्गासाठी १४ हजार कोटींचा खर्च
- वारकऱ्यांचे पाय भाजू नये यासाठी विशिष्ट पद्धतीचा रस्ता
- पालखी मार्गाच्या दुतर्फा स्वच्छतागृहे, वारकऱ्यांना विश्रामासाठी जागा
- ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेली झाडे राज्य सरकारच्या मदतीने रस्त्याच्या दुतर्फा लावणार
- या मार्गासाठी नागरिकांची सूचना केल्यास त्याचा विचार करणार

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in