देशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले  - neeta dhamale criticizes Sangram Deshmukh and Arun Lad | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुख व लाड हे पदवीधरांच्या विकासासाठी नसून राजकीय सोयीसाठी : नीता ढमाले 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

नीता ढमाले यांची प्रतिस्पर्ध्यांवर कठोर टीका

पुणे : पुणे विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून पदवीधरांचा मिळणारा प्रतिसाद आणि करविरनिवासींनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपला विजय नक्की असल्याचा आशावाद नीता ढमाले यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सर्व ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असो किंवा फुले, शाहू ,आंबेडकरांचा पुरोगामी विचार असो, त्यामध्ये महिलांना नेहमीच सन्मानाचे स्थान मिळाले आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात असो किंवा पुणे विद्यापीठाला देण्यात आलेले सावित्रीबाई फुले यांचे नाव असो, सामाजिक क्रांतीची ही भूमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही महिलांना राजकारणात महिलांना प्राधान्य देण्याचा विचार केला आहे.

पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत पुणे पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही कुठल्या महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही, ही शोकांतिका आहे. मात्र यंदा पदवीधर मतदार आणि विशेषतः महिला पदवीधर मतदार या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करतील अशी आपल्याला आशा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पदवीधरांमध्येही महिलांचे प्रमाण मोठे आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी आपल्या क्षमतेच्या बळावर ठसा उमटविला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात महिला उमेदवाराला संधी मिळाली तर खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाचे एक चांगले उदाहरण म्हणून त्याकडे पाहता येईल. या वेळी बोलताना ढमाले म्हणाल्या, ‘‘ पुणे पदवीधर मतदारसंघ मोठा आहे. पाच जिल्ह्यांचा मोठा भाग या मतदारसंघात येतो. मतदारांची संख्यादेखील मोठी आहे. या पाज जिल्ह्यांच्या परिसरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.भविष्यातही मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या संधीची कवाडे महिलांसाठी मोठ्याप्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख