राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण : म्हणून आढळरावांनी दिला हा आदेश - ncp targeting shivsena so fight grampanchayat election with full strengtth says ex MP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण : म्हणून आढळरावांनी दिला हा आदेश

रवींद्र पाटे
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होण्याची चिन्हे 

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूका सर्व शक्तीनिशी स्वबळावर लढवाव्यात, असा आदेश शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील मेळाव्यात दिला.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज सायंकाळी येथील जयहिंद मंगल कार्यालयात जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.या वेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी माजी आमदार शरद सोनवणे, तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे, सरपंच योगेश पाटे,माजी उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, नगराध्यक्ष शाम पांडे,बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे,जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे,मंगेश काकडे, शरद चौधरी आदी मान्यवर विविध गावचे माजी सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जरी असले तरी स्थानिक ग्रामपंचायत निवडणूका एकत्र लढवण्याचे स्पष्ट आदेश नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आघाडीच्या आचारसंहितेचे पालन केले जात नाही. अमिष दाखवून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचे काम सुरू आहे.समाजकारण व राजकारणाचा मूळ पाया ग्रामपंचायत निवडणूका हाच आहे. ग्रामपंचायतीत अस्तित्व नसेल तर अन्य निवडणुका लढवण्यात अर्थ नाही.

सहकार व ग्रामपंचायत ताब्यात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात बळकट झाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील २९४ ग्रामपंचायतिच्या निवडणूका होणार आहेत.ग्रामपंचायत निवडणूक अटीतटीची व स्थानिक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई असते.ग्रामपंचायत निवडणूका स्वबळावर सर्व शक्तीनिशी लढवा. मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घ्या. पक्षाची सर्व ताकद तुमच्या मागे उभी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

माजी आमदार सोनवणे म्हणाले शिवसेनेचा आमदार, खासदार नाही म्हणून निष्ठा बदलू नका. महाआघाडीचे सरकार वर आहे.स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणूक लढवून पुढील निवडणुकीची पायाभरणी करा. निवडणुकीसाठी पॅनेल तयार करा. आवश्यक ती मदत केली जाईल. या वेळी खंडागळे, पाटे, पांडे यांनी लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी  ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला.सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले. आभार महेश शेळके यांनी मानले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख