खासदार बापटांच्या राजकीय अस्ताची भविष्यवाणी वर्तविणाऱ्या जगतापांनी त्यांनाच बोलविले भेटिला... - NCP pune city president Prashant Jagtap invites MP Girish Bapat to visit NCP office | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार बापटांच्या राजकीय अस्ताची भविष्यवाणी वर्तविणाऱ्या जगतापांनी त्यांनाच बोलविले भेटिला...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

पुण्यातील राजकीय संस्कृतीच वेगळी... 

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक म्हणजे खासदार गिरीश बापट यांच्या राजकीय अस्ताची सुरवात असल्याचा  दावा करणारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आणि बापटांनाही आज सर्वांनाच धक्का दिला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांत सध्या राजकीय आरोप-प्रत्यरोपाच्या फैरी झडत आहेत. या फैरी काही तासांसाठी थांबविण्यात आल्या आणि दोन्ही पक्षांचे शहरातील नेते भेटले. ते कोठे भेटले तर राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयात! (BJP pune city office bearers visit Pune city Ncp office) 

राष्ट्रवादी काॅंग्रेसने पुण्यात नवीन शहर कार्यालयात आपला कारभार सुरू केला आहे. हे कार्यालय पाहण्यासाठी दिलदार मनाने भाजपचे खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदिश मुळिक आणि अन्य पदाधिकारी गेले. या कार्यालयाचे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केले होते. तसेच अजित पवार यांच्याहस्ते त्याचे उदघाटन झाले होते. या उदघाटन कार्यक्रमाला गर्दी जमविल्याबद्दल जगताप यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. या कारवाईची मागणी शहर भाजपनेच केली होती.

या साऱ्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.  आजच्या भेटीच्या वेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांत चांगली चर्चा रंगली. राष्ट्रवादीकडून जगताप यांच्यासह, प्रवक्ते अंकुश काक़डे उपस्थित होते.  खासदार गिरिश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या शहर कार्यकारीणीचे सदस्य उपस्थित होते.

जगताप यांनी पुणे पालिकेतून भाजपची सत्ता जाणार असल्याचा दावा `सरकारनामा`शी केला होता. तसेच या निवडणुकीचे नेतृत्व बापट यांच्याकडे भाजपने दिले असल्याने त्यांना बळीचा बकरा बनविण्याची तयारी असल्याचाही टोला त्यांनी लगावला होता. या निवडणुकीनंतर बापट यांच्या राजकीय अस्ताला प्रारंभ होणार असल्याचाही दावा त्यांनी केला होता.

जगताप यांच्या या आरोपाला महापौर मोहोळ यांनीही कडक उत्तर दिले होते. प्रशांत जगताप हे 2017 मध्ये राष्ट्रवादीकडून पुण्याचे महापौर होते. त्यांच्याच काळात राष्ट्रवादीची सत्ता गेली होती. आता ते शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या या कारकिर्दीतही राष्ट्रवादीचा पराभव निश्चित असल्याचा टोमणा मोहोळ यांनी `सरकारनामा`शी बोलताना लगावला होता.

या साऱ्या रणकंदनात दोन पक्षांतील पदाधिकाऱ्यांची भेट चर्चेची ठरली नाही तर नवलच. नेते आपापले मतभेद विसरून भेटू शकतात तर इतर कार्यकर्त्यांनीही वाद किती ताणावेत, याचाही संदेश यानिमित्ताने गेला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख