`विकासपुरूष देवेंद्र फडणवीस, असा बॅनर पाहिला की हसू येतं!` - NCP MLA Rohit Pawar taunts Devendra Fadnavis on his birthday flexes in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

`विकासपुरूष देवेंद्र फडणवीस, असा बॅनर पाहिला की हसू येतं!`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

पुण्यात अजित पवार आणि फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत फ्लेक्सची स्पर्धा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते अगदी जोमाने हा वाढदिवस साजरा करतात. या वाढदिवसाला आगामी महापालिका निवडणुकीची किनार असल्याने त्यातून राजकीय बाणही एकमेकांवर सोडले जात आहेत. 

पुण्यात तर ही फ्लेक्सची लढाई जोरात असून पुण्याचे खरे कारभारी, असा राष्ट्रवादीने अजित पवारांचा गौरव केला आहे तर भाजपने पुण्याचे विकासाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडवणीस यांना स्थान दिले आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपने फ्लेक्सबाजीतून आपापल्या नेत्यांचे गुण गाताना विरोधी नेत्यांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

या वादात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. पुण्याचा खरा विकास हा अजित पवार यांनी केला आहे, असे म्हणत आज जो काही पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास दिसतोय त्याला कारणीभूत आहेत माननीय अजितदादा!, असा दावा केला आहे. ``राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना आणि महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पुणे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना राज्यात सगळ्या विभागासाठी भरीव निधी दिलाच पण जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी निधी देताना अजितदादांनी कधीच हातचं राखून ठेवलं नाही. त्याचीच परिणीती आज पुणे शहराच्या विकासात दिसतेय.

आज पुण्यात मेट्रोचं काम दिसत असलं तरी मेट्रोचा प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्तेत असताना मंजूर केलाय, हे पुणेकरांना माहीत आहे. किंबहुना मेट्रोसाठी राज्य सरकारच्या वाट्याचा निधी देण्यास अजितदादांनी केलेले प्रयत्नही विसरता येणार नाहीत. शहराच्या पूर्व भागातील सुमारे १५ लाख लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भामा आसखेड पाणी योजनेमुळे निकाली निघाला आणि ही योजना आखण्यापासून ती पूर्णत्वास नेण्यापर्यंत अजितदादांनी केलेले प्रयत्न, दिलेला निधी याची माहिती पुणेकरांना आहे. या योजनेचं ८० % काम अजितदादांनी उपमुख्यमंत्री असताना पूर्ण केलं. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली, पण पाच वर्षात त्यांना उर्वरित २० % कामही पूर्ण करता आलं नाही. शेवटी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरच राहिलेलं कामही अजितदादांनी पूर्ण केलं, असे रोहित यांनी म्हटले आहे.

ससून रुग्णालयासाठी अजितदादांनी १५ मजली देखणी इमारत उभारली. अजितदादांनी ही इमारत उभारली पण सत्ता गेल्यानंतर भाजप सरकारला त्यातील अंतर्गत कामंही पाच वर्षे पूर्ण करता आली नाहीत. विशेष म्हणजे कोविड महामारीच्या आजच्या काळात हीच नवीन इमारत रुग्णांवर उपचार करण्यासाठी कामी आलीय आणि शेवटी अपूर्ण राहिलेलं काम गेल्या दिड वर्षात अजितदादांनीच पूर्ण केलं, असे म्हणत रोहित यांनी त्यांना श्रेय दिले आहे.

विकास हा असा रक्तात असावा लागतो. जनतेशी बांधिलकी, प्रशासनावरची पकड, विकास करताना लागणारी सौंदर्यदृष्टी, कामाचं सातत्य याबाबत अजितदादांचा हात कुणीही धरू शकत नाही. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड अजितदादांनी कधी केली नाही. पुण्यातील जिल्हा परिषदेची भव्य इमारत, नवीन सर्किट हाऊस, समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या इमारती यासाठी निधी हा अजितदादांनीच दिला. हे सर्व सांगायचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शहरात 'विकासपुरुष' आणि 'शिल्पकार नव्या पुण्याचे' या टॅग लाईनखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांचे बॅनर शहरात झळकताना दिसले आणि ते पाहून हसायलाही आलं. पण असे बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये, असा टोमणा रोहित यांनी मारला.

कदाचित फडणवीस साहेबांना याची काही माहितीही नसेल, पण त्यांना खूष करण्यासाठी काही नेत्यांनी हा उद्योग केला असावा, असं वाटतंय!, असाही शेरा त्यांनी मारला आहे. गेल्या वेळी याच पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मताचं दान टाकलं, पण त्यांनी काय केलं याची नोंद ठेवण्यास पुणेकर कधीच विसरत नाहीत. भाजपचे सगळेच नेते 'स्मार्ट सिटी'चे ढोल पिटत होते ती स्मार्ट सिटी कुठंय? महापालिकेत सत्ता असताना अनेक रस्त्यांची चाळण झालेली आणि फुटपाथ उखडलेले दिसतात. फक्त रंगसफेदी करून 'स्मार्ट सिटी' होत नसते, असे म्हणत खिल्ली उडविली आहे.  

भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, की पुणे हे नवं कधीच नव्हतं. पुण्याला मोठा आणि अभिमान वाटावा असा इतिहास आहे. आदरणीय पवार साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवडला आयटी हब, ऑटोमोबाईल हब अशी ओळख निर्माण करून देऊन जगाच्या नकाशावर आणलं आणि अजितदादांनी ही ओळख अधिक दृढ केली. आजही पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर तिथला विकास, रस्ते, गार्डन हे सर्व पाहून परदेशात गेल्याचा फिल येतो, यामागे अजितदादांनी घेतलेली मेहनत आहे. असं असताना 'नव पुण्याचे शिल्पकार' अशी जाहिरातबाजी करायला त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीच कसं वाटंत नाही? आज पेट्रोल- डिझेल, खाद्यतेल याचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलंय. असं असतानाही याविरोधात एखादा फ्लेक्स लावला असता तर सामान्य माणसासोबतच माझ्यासारख्यानेही त्याचं स्वागत केलं असतं. पण फक्त बॅनरबाजी आणि फ्लेक्सबाजी करुन हवेत विकास करण्याची सवय असलेल्या भाजपकडून अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे, असे रोहित यांनी पुढे नमूद केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख