पुण्यात आऊटगोइंग? : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप नगरसेवकाला अजितदादांकडे नेले - ncp mla meets ajit pawar with bjp corporator | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात आऊटगोइंग? : राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप नगरसेवकाला अजितदादांकडे नेले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

पुण्यात राष्ट्रवादीत `इनकमिंग`चे संकेत

पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक वर्षभर आलेली असताना मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता वर्तविण्यात येत होती. तशा हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी भाजपचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

पुण्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत 20 हून अधिक नगरसेवक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते. आता राष्ट्रवादीत पुन्हा इनकमिंगची अपेक्षा असून त्याची सुरवात नव्या वर्षात झाली आहे. 

वाल्मिकी आंबेडकर आवास (वॅम्बे) योजनेतंर्गत येरवडा येथील महात्मा गांधी नगर व जयप्रकाश नगरमध्ये बांधण्यात आलेली पक्की घरे लाभार्थींच्या नावे हस्तांतरीत करण्यात यावी, या मागणीच्या निमित्ताने वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष कर्णे गुरुजी हे अजित पवारांनी भेटले.

कर्णे हे महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलत असतात. सुरवातीला ते अपक्ष निवडून आले. नंतर त्यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप असा प्रवास केला. राष्ट्रवादीची सत्ता असताना ते स्थायी समितीचे अध्यक्षदेखील होते. पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी वडगाव शेरी मतदारसंघ महत्वाचा आहे. त्यामुळे कर्णे गुरूजी यांची ही भेट चर्चेची ठरली आहे.

त्यांच्या प्रभागातील महात्मा गांधी नगर व जयप्रकाश नगर येथे `गवनि` घोषित झोपडपट्टीच्या जागी वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेतंर्गत व बीएसयुपी योजनेतंर्गत विकसीत घरे महसूल व वनविभागाकडून पुणे महापालिकेडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव 2 जुलै 2018 पासून महसूल व वन विभागाकडे प्रलंबित आहे. शासनाच्या धोरणानुसार महापालिकेकडे हस्तांतरीत करुन संबधित लाभार्थ्यांच्या नावे हस्तांतरीत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या योजनेतंर्गत बांधण्यात आलेली घरे अद्याप लाभार्थींच्या मालकिची होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे टिंगरे व कर्णे गुरुजी यांनी  याबाबत संबधित यंत्रणांना आदेश देण्याची विनंती केली. त्यावर अजितदादा यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. हा प्रश्न निकाली लागण्यासोबत कर्णे गुरूजी यांचाही आगामी राजकीय मार्ग मोकळा झाला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख