महापौर असताना खासदार बापटांना ताप देणाऱ्या प्रशांत जगतापांवर आता ही नवीन जबाबदारी

2022 च्या महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे जगतापांसमोर आव्हान...
महापौर असताना खासदार बापटांना ताप देणाऱ्या प्रशांत जगतापांवर आता ही नवीन जबाबदारी
prashant jagtap

पुणे  ः राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आणि पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असे समीकरण 2014 ते 2017 या कालावधीत होते. या कालावधीच्या शेटवच्या टप्प्यात गिरीश बापट (Girish Bapat) हे पुण्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप हे पुण्याचे महापौर होते. (Pune Mayor) जगताप यांनी प्रोटोकाॅलच्या मुद्यावरून, राज्य सरकारच्या पुण्याला सापत्नभावाविषयी तक्रार करत सतत बापट यांच्याशी सामना सुरू केला. गेली चार वर्षे जगताप यांच्याकडे कोणतीच जबाबदारी नव्हती पण आता राष्ट्रवादीने पुन्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी देत पुन्हा भाजपशी सामना करण्याचे आव्हान त्यांच्यावर सोपवले आहे. (Prashant Jagtap appointed as NCP pune city chief)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या आगामी २०२२ मधील निवडणुकीत सत्ता काबिज करायचीच, हे ध्येय राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवले आहे. PMC election 2022) त्या दृष्टीने पक्षाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातून एक व्यक्ती, एक पद या धोरणानुसार आमदार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदासाठी माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आदींची नावे चर्चेत होती. त्यात प्रशांत जगताप यांनी बाजी मारली. जगताप हे वानवडी प्रभागातील नगरसेवक आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे पुणे महापालिकेची सत्ता २००७ मध्ये आली. तत्पूर्वी पुण्याची सत्ता कॉंग्रेसकडे होती. त्यानंतर सलग दोन निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक नगरसेवक निवडणून आणत महापालिकेतील सत्ता राखली होती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे शहरात पहिल्यांदाच भाजपचे तब्बल ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. या लाटेतही पक्षाचे सुमारे ४२ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडून आणले होते. कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांची संख्या सिंगल डिजिटवर आहे. 

महापालिकेची निवडणूक आता ८ महिन्यांवर आली आहे. यंदा काहीही झाले तरी, सत्ता पुन्हा काबिज करायची, असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमांतही त्या बाबत सातत्याने सूतोवाच केले होेते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in