लशीवरून राजकारण; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातच मिळेना लस

राजकीय दबाव व अधिकाऱ्यांच्या हितसंबधातून ही कृत्रिम लसटंचाई निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लशीवरून राजकारण; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागातच मिळेना लस
NCP corporator slams BJP over politics on corona vaccine

पिंपरी : कोरोना लसीकरणात भेदभाव केला जात असून विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या झोपडपट्टीच्या प्रभागाला कमी लस दिली जात असल्याचा हल्लाबोल पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी केला आहे. सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या प्रभागाला लस व लसीकरणात झुकते माप देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (NCP corporator slams BJP over politics on corona vaccine)

प्रभागातील (क्र.९) चारही नगरसेवक हे राष्ट्रवादीचे असल्याने लसपुरवठा व लसीकरणात भेदभाव केला जात असल्याचा दावा मंचरकर यांनी केला आहे. राजकीय दबाव व अधिकाऱ्यांच्या हितसंबधातून ही कृत्रिम लसटंचाई निर्माण केली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे लस कमी करून ती सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात ती अधिक दिली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

लसीचा पुरवठाच होत नसल्याने प्रभागातील लसीकरण केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत आहे, असे त्यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. लस का येत नाही, यामागील कारणही सांगितले जात नसल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या प्रभागातील लसीकरण केंद्रात पूर्णपणे अव्यवस्थापन आहे, असे त्या म्हणाल्या. आजही हे केंद्र बंद असल्याची माहिती त्यांनी दिली.

अगोदरच केंद्राकडून पुरेसा लसपुरवठा होत नसल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्रे पालिकेला सुरु ठेवता येत नाहीत. लसनिर्मितीसाठी पालिकेने एच. ए. कंपनीला २५ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र,केंद्राने या कंपनीत लसीकरण निर्मितीला अद्याप परवानगी दिली नसल्याने शहरातच लस मुबलक उपलब्ध होण्याचा तो मार्गही अद्याप बंदच आहे. त्यातूनच या लसीची कृत्रिम टंचाई निर्माण करून तिच्या पुरवठ्यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप आता झाला आहे. 

नगरसेविका मंचरकर यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या लेखी तक्रारीत हा आरोप केला आहे. लस व लसीकरणातील हा भेदभाव तातडीने संपुष्टात आणण्यासाठी पावले उचलण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना या पत्राव्दारे केली आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू नये, म्हणून याअगोदरच लस व लसीकरणाच्या टोकनचा काही कोटा नगरसेवकांसाठी राखून ठेवण्याचीही मागणी पुढे आलेली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in