गिरीश बापट यांचा `मानाचा गणपती` उठविण्याचा 2009 मध्येच प्रयत्न : मुलाचा आरोप

वडिलांच्या कारकिर्दीचा आढावा आणि त्यांच्याबद्दलच्या भावना गौरव बापट यांनी पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
गिरीश बापट यांचा `मानाचा गणपती` उठविण्याचा 2009 मध्येच प्रयत्न : मुलाचा आरोप
girish bapat-gourav bapat.jpeg

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा भाजपमधील `मानाचा गणपती` 2009 च्या विधानसभा निवडणुकीत उठविण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप त्यांचे पूत्र गौरव बापट यांनी केला आहे. त्यांनी याबाबत सविस्तर लिहिलेले नाही. पण त्यांचा रोख पक्षांतर्गत वादावर असल्याचे दिसून येत आहे.

गिरीश बापट यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना गौरव यांनी वडिलांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी वडिलांनी टेल्को कंपनीची नोकरी करत करत असंख्य मित्रवर्गाच्या, कार्यकर्त्यांच्या जोरावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रचंड निष्ठा ठेऊन तीन टर्म नगरसेवक, 5 टर्म बारा बलुतेदारांच्या कसब्यातून विधानसभा सदस्य, 1 टर्म या राज्याचे मंत्री आणि आता लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात पुण्यातून लोकसभा सदस्य म्हणून काम करत आहात. तुमचा राजकीय आलेख कायम चढता राहिला, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

वडिलांबद्दल लिहिताना त्यांना कसा विरोध झाला याचा ओझरता उल्लेख केला आहे. मात्र तो चपखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख यात आहे. ``तुमच्या 2009 च्या निवडणुकीत आपल्याच काही मित्रांनी त्यांच्यापरीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरी मानाचा गणपती बुडवा असं सांगत होते एकमेकांना... मानाचा गणपती पूर्ण वेळ मांडवात बसतो आणि सन्मानानीच उठतो हे कळण्याएवढीही बुद्धी नसते काही जणांमध्ये!``, असे गौरव यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत गिरीश बापट यांना 54 हजार 982, मनसेचे रवींद्र धंगेकर यांना 46 हजार 820 आणि काॅंग्रेसचे रोहित टिळक 45 हजार 728 मते मिळाली. यात 8162 मतांनी बापट यांचा विजय झाला. अनपेक्षित आणि कमी मताधिक्य बापट यांना मिळाले. गौरव यांचा रोख तत्कालीन पक्षांतर्गत विरोधकांकडे तर नाही ना, अशी शंका त्यामुळे येते. बापट यांना उमेदवारी देऊ नये यापासून पक्षातील त्यांच्या विरोधकांनी फिल्डिंग लावली होती. इतर इच्छुकांनीही आपल्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. तरी त्यावर मात करून बापट निवडून आले. पण ते कमी मताधिक्य त्यांच्या मनातून अजूनही असल्याचे दिसून येते आहे. गौरव यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्या काळातील बापट यांचे पक्षांतर्गत विरोधक कोण होते, हे सर्वांनाच माहिती आहे. या निमित्ताने गौरव यांनी जुनी भळभळती जखम व्यक्त केली. या सर्वांवर बापट यांनी कशी मात केली, हे पण त्यांनी लिहिले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in