शिवसेनेने ताकद दिली असती तर मी आमदार झालो असतो आणि लक्ष्मण जगताप माजी आमदार... - If Shiv Sena had given me strength, I would have become an MLA says Rahul Kalate | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेने ताकद दिली असती तर मी आमदार झालो असतो आणि लक्ष्मण जगताप माजी आमदार...

उत्तम कुटे
शनिवार, 19 डिसेंबर 2020

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी नेत्यांनी बळ देण्याची मागणी 

पिंपरी : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीला वेळीच पक्षाने ताकद दिली असती,तर आज मी ही आमदार असतो, अशी खंत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ही ताकद न मिळाल्याने पराभूत झालेले शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी काल पुणे येथे आपल्या वरिष्ठ नेत्यांसमोर व्यक्त केली.

वेळ निघून गेल्यावर ताकद मिळवून काय उपयोग? पश्चातापाची पाळी येऊ न देण्यासाठी अशी ताकद वेळीच ताकद देणे व मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत गटनेते असलेल्या कलाटेंनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवून भाजपचे लक्ष्मणभाऊ जगताप यांना कडवी झुंज दिली होती. शिवसेनेने पुणे जिल्ह्यासाठी नेमलेले संपर्कमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीतच कलाटे यांनी बॅंटिंग केली.

खडकवासला विधानसभा मतदारंघातून शिवसेनेकडून इच्छुक असलेले व आपला उमेदवारी अर्ज भरलेले रमेश कोंडे यांनीपण सेना नेते आधी तयारी करायला सांगतात आणि नंतर माघार घ्या म्हणून सांगतात, असे म्हणत माघार घेण्यासाठी एसएमएस येतो. आम्ही तो आदेश मानतो पण वेळेत सांगितले तर बरे होईल, अशी अपेक्षा परब यांच्यासमोर व्यक्त केली. कलाटे आणि कोंडे यांच्या भाषणातून सेना नेत्यांना योग्य चिमटे बसले, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती.  चिंचवड मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप होते. मात्र काॅंग्रेस आणि राष्टवादीच्या आघाडीने तेथे उमेदवारच दिला नव्हता. युती असताना सेनेच्या कलाटेंनी जगतापांविरोधात झेंडा फडकावला. त्यामुळे काॅंग्रेस आघाडीने कलाटेंना शेवटच्या क्षणी त्यांनी पुरस्कृत केले होते. युती असल्याने शिवसेनेने त्याचे पालन करत बंडखोर कलाटेंऐवजी जगताप यांना मदत केली.

त्या निवडणुकीत त्यामुळे सव्वा लाखांच्या मताधिक्यांनी विजयी होऊ, असा दावा जगताप यांनी केला होता. मात्र, ३८ हजार ४९८ मतांच्या फरकावरच त्यांना समाधान मानावे लागले होते. एका फेरीत,तर कलाटे आघाडीवर गेल्याने भाऊ समर्थकांची धूकधूकही वाढली होती. म्हणून पक्षाची ताकद मिळाली असती,तर मी ही आज आमदार असतो, अशी रास्त अपेक्षावजा खंत कलाटे यांनी काल बोलून दाखवली.

कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्याला पक्षाने ताकद देण्याची मागणी यावेळी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या कामातच नाही, तर कचरा,पाणी अशा सगळ्याच टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यातून राज्यात आपली सत्ता आहे, हे पालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या ध्यानात येईल,अ से ते म्हणाले. पूर्वीच्या सरकारने शास्तीकरात अंशत: सवलत दिली आहे. ती सरसकट देऊन शहरातील साठ,सत्तर हजार कुटुंबांना पूर्ण व मोठा दिलासा देण्याचीही मागणी त्यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख