राज्यात गाजलेला खेड सभापतीवरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाकडून रद्द

या अविश्वास ठरावावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली होती..
khed panchayat samiti
khed panchayat samiti

राजगुरुनगर, ता. २७ : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्दबातल ठरविला असून अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश एस. कासावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला, अशी माहिती अपिलार्थींचे वकील रोहन होगले यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्यात, गेले दोन महिने सुरू असलेल्या राजकीय नाट्याची  उत्कंठा अजून वाढली आहे. 

शिवसेनेचे खेड पंचायत समितीचे सभापती पोखरकर यांच्या विरोधात ३१ मे रोजी अविश्वास ठराव ११ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाल्याचे पीठासीन अधिकारी असलेले खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घोषित केले होते. त्या निर्णयाला आव्हान देत सभापती पोखरकर, पंचायत समिती सदस्य कॉंग्रेसचे अमोल पवार व शिवसेनेच्या ज्योती अरगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. याचिकेवर माननीय न्यायाधीश एस. सी. गुप्ते आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर १० जून रोजी सुनावणी झाली.

त्यावेळी खंडपीठाने नवीन सभापती निवडीस २५ जूनपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर पुढील काही तारखा पडल्या, पण न्यायालयाचे कामकाज झाले नाही. शेवटी आज ( २७ जुलै  ) माननीय न्यायाधीश एस. कासावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यावर, खंडपीठाने अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ .प्रसाद दाणी,  विवेक साळुंके आणि  रोहन होगले यांनी कामकाज पाहिले. 

सभापती पोखरकर यांच्यावर २४ मे रोजी, शिवसेनेच्याच सहा सदस्यांनी बंड करीत अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आणि भाजपच्या एकमेव सदस्य, विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर ठरावाचे समर्थक सदस्य सहलीला गेले होते. दरम्यान ते पुण्याजवळ ज्या रिसॉर्टवर थांबले होते, त्याची माहिती पोखरकर व समर्थकांना मिळाली. त्यानुसार पोखरकर समर्थकांसह त्याठिकाणी गेले व त्यांनी राडा केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. ते अजूनही अटकेत आहेत. तसेच तेव्हापासून राजकीय सहलीवर गेलेले बहुसंख्य सदस्यही  अजूनही सहलीवरच आहेत. शिवसेनेकडून पुन्हा काही आगळीक होण्याच्या भीतीने, या प्रकरणाचा संपूर्ण शेवट झाल्याशिवाय ते परतण्याच्या मनस्थितीत नाहीत. 

अविश्वासाच्या आणि राडेबाजीच्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपांची धुळवड रंगली होती.  राष्ट्रवादीच्या बाजूने आमदार दिलीप मोहिते व शिवसेनेच्या बाजूने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाग्युद्ध पेटले होते.

दरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राजगुरूनगर येथे येऊन आमदार मोहितेंवर थेट शरसंधान केले होते. तसेच आमदारांनीही त्यांना उपहासात्मक प्रत्युत्तर दिले होते. मात्र दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी सबुरीची भूमिका घेतल्यानंतर तलवारी म्यान झाल्या होत्या. तरी दोन्ही पक्षांमधील दुस्वास, पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळणाच्या उद्घाटननिमित्ताने पुन्हा उफाळून आला होता. 

 शिवसेनेच्याच आठपैकी सहा सदस्यांनी बंडखोरी केल्याने, पोखरकरांवरील अविश्वास ठराव मंजूर झाला होता.  शिवसेनेचे बहुमत असतानादेखील, शिवसेनेच्याच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने शिवसेना चिडली होती. या अविश्वासामागे आमदार मोहिते यांचा हात असल्याच्या समजावरून सेनेने त्यांना लक्ष्य केले होते. तसेच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणा-या, शिवसेनेच्या ६ सदस्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल, अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ९ जून रोजी दाखल केलेला आहे. त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या सहा सदस्यांपैकी एक सदस्य मच्छिंद्र गावडे शिवसेनेच्या गोटात परतले आहेत. आता पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान होताना काय घडणार, याबाबत उत्कंठा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com