पुण्यासाठी दोन सुखावणाऱ्या बातम्या : शनिवारी व रविवारी दुकाने सुरू राहणार; कोरोनाचे आकडे आटोक्यात

पुण्यातील रुग्णांची संख्या सलग तीन दिवस सातशेपेक्षा कमी
पुण्यासाठी दोन सुखावणाऱ्या बातम्या : शनिवारी व रविवारी दुकाने सुरू राहणार; कोरोनाचे आकडे आटोक्यात
rajesh tope

पुणे : पुण्यासाठी दोन महत्वाच्या घडामोडी आणि दिलासा देणाऱ्या घटना आज आहेत. पुण्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी असणारा कडक लाॅकडाऊन हा रद्द करण्यात आला आहे. या दोन दिवशीही आता अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते 11 सुरू राहणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यामुळे पुण्यातील कडक लाॅकडाऊन संपण्याकडे ही पावले असल्याचे स्पष्ट झाले. दुसरी घटना म्हणजे पुण्यात सलग तिसऱ्या दिवशीही नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही सातशेपेक्षा कमी राहिली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाची दुसरी लाट शेवटाकडे आल्याचेही स्पष्ट झाले. (Govt lifts weekend lockdown in Pune) 

दुसरीकडे  राज्यातील लॉकडाऊनमध्ये आणखी 15 दिवसांनी वाढ करण्यात येणार आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण संख्येच्या परिस्थितीनुसार नियमात शिथिलता आणण्यात येईल. याबाबतचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना मुख्यमंत्री 1 जून रोजी जाहीर करतील, असे टोपे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता. 28) कोरोना परिस्थिती संदर्भात आढावा बैठकीनंतर आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. टोपे म्हणाले, ``पुण्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत आहे. परंतु आठवड्याचे हे सरासरी प्रमाण हे 11.9 टक्के आहे. राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना चाचण्या शास्त्रीय पद्धतीनेच कराव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. सध्या गृह विलगीकरणाचे प्रमाण हे 80 टक्के आहे. ते कमी करून 56 रस्त्यावर आणले आहे. हे प्रमाण आता 25 ते 30 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. गृह विलगीकरणामुळे इतर कुटुंबीय आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी 'आयसीएमआर' च्या सूचनेनुसार संस्थात्मक विलगीकरण वाढविण्याची गरज आहे.

रुग्णालयातील प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून ज्यादा वैद्यकीय बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दीड लाख रुपयांवरील वैद्यकीय बिलांचे ऑडिट करण्यात येत होते. मात्र, आता प्रत्येक बिलाचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, लेखापरीक्षकांची यादीही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत पुण्यातील प्रशासनाने उत्तम कामगिरी केली आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ज्यादा आकारणी करण्यात आलेली 9 कोटी रुपये इतकी रक्कम संबंधित रुग्णालयांकडून केली आहे.

'म्युकरमायकोसिस' रुग्णांवर मोफत उपचार :

'म्युकरमायकोसिस' बुरशीच्या आजारावरील रुग्णांना रुबी, जहांगीरसारख्या मोठ्या खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर त्यावरील येणारा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून भरला जाईल. या रुग्णांना इंजेक्शन आणि उपचार सर्व मोफत उपलब्ध करून देण्यात येतील. या आजारावरील इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

वारीबाबत मंत्रीमंडळ निर्णय घेणार

काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. वारकरी सांप्रदायिक कोरोनाचे सर्व नियम पाळेल. सातशे वर्षांची परंपरा अखंडित राहावी अशी मागणी, अशी मागणी वारकऱ्यांनी आज केली. यावर वारकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे त्यांचे म्हणणे मंत्रीमंडळात मांडू त्यापूर्वी वारकरी संप्रदायाशी संबंधित आणखी घटकांशी बोलू मुख्यमंत्र्याकडे हा विषय मांडून निर्णय केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

पुणे कोरोना अपडेट
28 मे - शुक्रवार
.......
- दिवसभरात 573 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 999 रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत 29 रुग्णांचा मृत्यू. 12 पुण्याबाहेरील

- 981 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या - 468702

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7535

- एकूण मृत्यू - 8177

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज - 452990

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8200

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in