गौतम पाषाणकर कोल्हापूरात दिसले.... पण नंतर कुठे गायब झाले?

पुणे पोलिसांसमोर शोधण्याचे आव्हान
गौतम पाषाणकर कोल्हापूरात दिसले.... पण नंतर कुठे गायब झाले?
pashankar-goutam-f

पुणे ः पुण्यातील पोलिसांपुढे उद्योजग गौतम पाषाणकर यांना शोधण्याचे कोडे अद्याप कायम आहे. पाषाणकर हे बेपत्ता होऊन महिना झाला तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. व्यावसायिक अपयश, त्यांनी आत्महत्या करण्यासाठी जात असल्याबद्दल लिहिलेली चिठ्ठी, पाषाणकरांवर राजकीय व्यक्तींचा दबाव असल्याचा त्यांच्या मुलाने केलेला आरोप, ते कोल्हापूरपर्यंत दिसल्याचा पुणे पोलिसांचा दावा अशा साऱ्या बाबींमुळे पाषणकरांच्या बेपत्ता होण्यातील गुंतागुंत वाढत आहे. 

त्यांच्या बेपत्ता होण्याला बरोबर 29 दिवस उलटले आहेत. तरीही त्यांचा निश्चित ठावठिकाणा कळू शकला नाही. पाषाणकर यांनी त्यांचा मोटारचालकाकडे एका बंद लिफाफ्यात चिठ्ठी दिली. मुलगा कपिल याने राजकीय व्यक्तीवर या प्रकरणात आरोप केल्याने त्याचे गांभीर्य वाढले. तसेच ही व्यक्ती मंत्रालयात ठाण मांडून असल्याचा दावा त्याने केला होता आणि पुणे पोलिस त्या व्यक्तीचा तपास करत नसल्याची तक्रार केली होती. मात्र त्या व्यक्तीचे नाव जाहीरपणे सांगण्यास कपिलने नकार दिला होता. त्यामुळे ती राजकीय व्यक्ती कोण आणि पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले का यावर पोलिसांकडूनही अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.

पाषाणकर बेपत्ता झाल्याच्या 18 दिवसांनंतर आठ नोव्हेंबर रोजी एक आशेचा किरण दिसून आला होता. पाषाणकर हे कोल्हापूरमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर सीसीटीव्हीत दिसून आले होते. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक कोल्हापूरला रवाना केले होते. मात्र त्यांना ते मिळून आले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी सहा पथके केली असून कोकणातही त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

तुमच्या वडिलांचा शोध सुरू असून आपण स्वतः: तपासावर लक्ष ठेवून आहोत, असे पोलिस आयुक्तांनी कपिल पाषाणकर यांना सांगितले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in