पुणे : कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याने मुंबईतील तळोजा करागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढीत शक्तीप्रदर्शन केल्या प्रकरणी त्याला व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. न्यायालयीने कोठडी मिळाल्याने त्याची सुटका होण्याच्या मार्गावर आहे. दुसरा गुंड शरद मोहोळ याचीही जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे पुण्यातील दोन मोठे गॅंगस्टर पुन्हा मोकळे राहणार असल्याने पोलिसांसमोरील डोकेदुखी वाढणार आहे.
खुनासारख्या मोठ्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर पुन्हा जम बसविण्यासाठी या गुंडांनी शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. त्यातून पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या दोघांनाही पुन्हा तुरुंगात डांबण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होत असल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या 200 साथीदाराविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह 9 जणाना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकि 27 जणाची नावे निष्पन्न झाली आहेत.
गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) यांना अटक करण्यात आली होती.
मारणे याला दोन खून प्रकरणात २०१४ मध्ये अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती. त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान, दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
त्यानंतर सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरड केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणुक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाले. मारणे निर्दोष सुटलेल्यानंतर 500 वाहनांसह शक्तिप्रदर्शन करून त्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल केले. एवढ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा आणून आरोपींचा काही कट आहे का? आरोपींनी जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. गुन्ह्यातील दोनशे ते अडीचशे साथीदार आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास करायचा आहे.गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीनशे गाड्यांची माहिती काढून त्या जप्त करायच्या आहेत. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कोणी आर्थिक सहाय्य केले याचा तपास करायचा आहे. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केला. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने पुढील चोवीस तासांत तो तुरुंगाबाहेर येऊ शकतो.
गुंड शरद मोहोळ व साथीदारांना जामीन
गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन करीत दहशत निर्माण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला. खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यावर गुंड शरद मोहोळ याने एका कार्यक्रमात शक्ती प्रदर्शन केल्याप्रकरणी त्याच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री अटक केली आहे. गुंड शरद हिरामण मोहोळ (वय ३८), विश्वास बाजीराव मनेरे (वय ३७), मनोज चंद्रकांत पवार (वय ४२), स्वप्नील अरुण नाईक (वय ३५) आणि योगेश भालचंद्र (वय ४०) यांना अटक करण्यात आली होती. तर अक्षय भालेराव, सीताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या गुन्ह्यातून शरद मोहोळ याला येरवडा कारागृहातून नुकतेच सोडण्यात आले आहे. त्यानंतर एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी २६ जानेवारी रोजी त्याला बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ उपस्थित राहिला होता. त्यासह त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही. आरोपींनी आकडाओरडा करून दहशत निर्माम केली. त्यामुळे नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शरद मोहोळ हा कुख्यात गुंड असून त्याची शहरात दहशत आहे. संबंधित कार्यक्रमाच्या वेळी कार आणि दुचाकीवरून येत त्यांनी गुरुवार पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण केली. त्याठिकाणी एकत्रित येऊन आरोपींचा कोणते गैर कृत्य करण्याचा उद्देश होता का? याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गुन्ह्यात वापरलेली वाहने आरोपींकडून जप्त करायची आहेत. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी खडक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे यांनी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवाद केला. आरोपींच्यावतीने ऍड. अमोल ढमाले, ऍड. मनीष पाडेकर, ऍड. संजय साळुंखे आणि ऍड. अश्विनी खंडाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

