गुंड गजा मारणे आला आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून गेला

पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड येथील पोलिस पथके त्याच्या मागावर होती.
गुंड गजा मारणे आला आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून गेला
gaja marane

पुणे : खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर तळोजा तुरूंग ते पुणे अशी जंगी मिरवणूक काढणाऱ्या गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यामुळे पोलिसांची नाचक्की झाली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस त्याला इतर गुन्ह्यांत ताब्यात घेणार होते. मात्र तो न सापडल्याने त्याचा फरार म्हणून पोलिस शोध घेत होते. तो आज पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. एका गुन्ह्यातील जामिनासाठी आज दुपारी मारणे वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली.

मिरवणूक प्रकरणात गेल्या आठवड्यात मारणे याच्यावर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यासह पिंपरी व ग्रामीणचे पोलिस मारणे यांच्या शोधात आहेत. मात्र, पोलिसांना हवा असलेला हा आरोपी न्यायालयात येऊन जामीन घेऊन गेला तरी पोलिसांना त्याची खबर मिळाली नाही.

मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पाचशे वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी जिल्हा, पिंपरी व पुणे पोलिसांकडे त्याच्यावर पाच गुन्हे दाखल झाले आहेत. या मिरवणुकीत त्याला वाहने पुरविणारे तसेच त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. यातील काहीजणांना अटक करण्यात आली आहे. मारणे टोळीचा मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्प्ता यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

या साऱ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या नाकावर टिच्चून न्यायालयात हजर राहिलेल्या मारणेचा ठावठिकाणा पोलिसांना कसा लागला नाही या बाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुंड मारणे याच्यावरी एका गुन्ह्यात जामिनासाटी थेट वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने त्यास १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. जामीन मिळाल्यानंतर तो तत्काळ न्यायालयातून बाहेर पडला. मात्र, पोलिसांना याचा पत्ताच नसल्याने तो पसार झाला. गुंड मारणे पसार झाल्याने पुण्यासह पिंपरी व ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in