आमदार काकांचे बोगस फेसबुक अकाउंट समजले अन् पुतण्या आला धावून - Fake Facebook account in the name of MLA Dilip Mohite-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

आमदार काकांचे बोगस फेसबुक अकाउंट समजले अन् पुतण्या आला धावून

उत्तम कुटे
रविवार, 25 जुलै 2021

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नावे असेच बनावट अकाउंट बनवून हजारो रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आढळले आहे.

पिंपरी : फेसबुक अकाउंट हॅकिंगनंतर आता पुढाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट उघडून त्याव्दारे पैशाची मागणी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या नावे असेच बनावट अकाउंट बनवून हजारो रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आढळले आहे. दरम्यान, यातील पन्नास हजार रुपयांची केलेली मागणी ही हिंदी भाषेत केल्याने या अज्ञात व्हाईट कॉलर क्रिमिनलचा डाव फसला. तसेच आमदारांच्या नावे बोगस अकाउंट सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार त्यामुळे समोर आला. (Fake Facebook account in the name of MLA Dilip Mohite)

हा प्रकार समजताच मोहितेंचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते (वय ३५,रा. शेल पिंपळगाव,ता.खेड,जि.पुणे) यांनी लागलीच शनिवारी (ता.२४) खेड पोलिस ठाण्य़ात धाव घेऊन लेखी तक्रार दिली. मोहिते यांना याचवर्षी एप्रिल महिन्यात सातारा येथे हनीट्रॅपमध्ये अडकावण्याचा प्रयत्न झाला होता. त्या गुन्ह्यातही बांधकाम व्यावसायिक असलेल्या मयुर यांनीच फिर्याद दिली होती. तर, आताही आपले चुलते मोहितेंच्या नावे खोटे फेसबुक अकाउंट कोणीतरी सुरु करून त्याव्दारे हजारो रुपयांची मागणी केल्याचे समजताच मयूर यांनीच पहिली तक्रार पोलिसांत दिली. पन्नास हजार रुपये मागणाऱ्याखेरीज आणखी एकाने १२ हजार रुपयांची मागणी या बनावट अकाउंटव्दारे केल्याचे दिसून आले आहे. 

हेही वाचा : दिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला!

पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी येथे राहणारे मोहितेंचे दुसरे पुतणे व युवक राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते हे पूर्वी आमदारांच्या ट्रबलशूटरची भूमिका बजावत होते. मात्र, नंतर या चुलता-पुतण्यात वितुष्ट आले. त्यातून डॉ. शैलेश यांनी आमदारांना हनीट्रॅपमध्ये अडकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे प्रकरण एप्रिल महिन्यात सातारा येथे समोर आले. त्या गुन्ह्यात डॉ. अटक झाल्यानंतर डॉ.शैलेश यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. तेथपासून मयूर हे आमदारांचे काहीसे संकटमोचकाच्या भूमिकेत आले आहेत.

स्वत: आमदार मोहितेंना हा प्रकार समजताच त्यांनी सुद्धा खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आपल्या नावे बनावट फेसबुक अकाउट काढण्यात आले असून त्याव्दारे पैशाची मागणी केली जात असल्याचे आढळले आहे. परिणामी आपल्याविषयी गैरसमज पसरण्याची शक्यता असल्याने हे अकाउंट उघडलेल्या आरोपीला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोहितेंनी पोलिसांकडे केली आहे. या खोटेपणाला बळी न पडता कारस्थान करणाऱ्या अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन जनतेला केले आहे. 

दरम्यान, रविवारी (ता.२५) सायंकाळपर्यंत मोहिते व त्यांच्या पुतण्याच्याही तक्रारीवर गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्याला सरकारनामाशी बोलताना मयूर यांनी दुजोरा दिला. हा विषय सायबर क्राइमच्या अखत्यारीतील असल्याने त्यावर तेच गुन्हा नोंद करून कारवाई करतील, असे खेड पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख