`माझ्यासोबत राष्ट्रवादीत चल, असे खडसे साहेब मला कधीच म्हणणार नाहीत....`

दिलीप कांबळे आणि खडसे यांचे संबंध अत्यंत निकटचे होते.
`माझ्यासोबत राष्ट्रवादीत चल, असे खडसे साहेब मला कधीच म्हणणार नाहीत....`
dilip-kambale-ff.jpg

पुणे : माझ्यासोबत राष्ट्रवादीत चल, असे मला एकनाथ खडसे साहेब कधीच म्हणणार नाहीत, असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केली.

खडसे यांनी आज राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांचे खानदेशात मोठ्या प्रमाणात समर्थक असले तरी पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्यांना फारसे पाठीराखे नाहीत. पुण्यात त्यांचे एकमेव कट्टर समर्थक म्हणजे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे. मात्र ते कांबळेही भाजपसोबतच राहणार आहेत.

दिलीप कांबळे आणि खडसे यांचे संबंध अत्यंत निकटचे होते. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत कांबळे यांचे नाव नसल्याचे समजताच खडसे यांनी, कांबळे यांचा शपथविधी झाल्यावर मी मंत्रिपदाची शपथ घेईन, अशी टोकाची भूमिका घेतली. शेवटच्या क्षणी भाजपाला कांबळे यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले जाते. तेव्हाच खडसे हे स्वतः शपथ घेण्यास तयार झाल्याचे सांगण्यात येते. खडसे हे पुण्यात आल्यानंतर कांबळे यांच्याशी निवांत गप्पा मारायचे. कांबळे यांचे बंधू सुनील हे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपचे आमदार आहे. सुनील हे पुणे महापालिकेचे सदस्यही आहेत.

ज्यांच्यासाठी खडसेंनी इतकी टोकाची भूमिका घेतली ते कांबळेही आज सायंकाळी सव्वा सातपर्यंत फोन स्वीकारत नव्हते. खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी `सरकारनामा`ने वारंवार प्रयत्न केले. त्यानंतर त्यांचा फोन आला. 

खडसे यांच्या पक्षत्यागामुळे भारतीय जनता पक्ष आणि स्वत: खडसे या दोघांचाही तोटा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. खडसे यांना राष्ट्रवादीत कितपत मानसन्मान मिळेल, याची मला शंका वाटते. राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना सन्मान दिला पण खडसेंना देतील की नाही, यावर माझा अजून विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले. खडसे यांना भाजप सोडू नका, असा सल्ला तुम्ही दिला नाही का, या प्रश्नावर कांबळे म्हणाले की तसा सल्ला द्यायला मी छोटा माणूस आहे. पण कोरोना संकट सुरू होण्याआधी मी त्यांना पक्ष न सोडण्याची विनंती केली होती. मात्र मला पक्षात त्रास होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही मी याबाबत एकत्र बसून मतभेद दूर करण्याची विनंती केली होती. पण तसे झाले नाही.

तुम्ही खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार का, या प्रश्नावर कांबळे यांनी नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले. पण खडसेंनी तुम्हाला आग्रह केला तर यावर ते तसा आग्रह करणार नाही, असा मला विश्वास आहे. राज्यातील भाजपमधील त्यांच्या समर्थकांनाही ते तसा फोन करणार नाहीत, असे कांबळे यांनी स्पष्ट केेले. माझा आणि त्यांचा 1990 पासून संबंध आला. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही एकत्र काम करत होतो. त्यांचा आणि माझा स्वभाव जुळल्याने आमचे घनिष्ठ संबंध असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in