पुणेकरांनी नावं ठेवण्याबाबत देवांनाही सोडलं नाही! अजितदादांनी मिश्किलपणे लगावला टोला

वारजे येथील संजीवन वन उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. डुक्कर खिंड परिसरात हा कार्यक्रम होता. या नावाचा संदर्भ देत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
पुणेकरांनी नावं ठेवण्याबाबत देवांनाही सोडलं नाही! अजितदादांनी मिश्किलपणे लगावला टोला
Dy CM Ajit Pawar comments on Gods name in pune

पुणे : जगात कुठंही नाही ते पुण्यात सापडते. नावं ठेवायला तर पुणेकरांचा हात कुणीच धरणार नाही. पुण्याच्या पाट्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्टाला कुतूहल असतं. शहरात पासोड्या मारुती, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा, डुल्या मारुती, जिलब्या मारुती अशी नावं आहेत. यातील गंमतीचा भाग सोडून द्या, पण पुणेकरांनी नावं ठेवण्याबाबत देवांनाही सोडलं नाही, असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना लगावला आहे. (Dy CM Ajit Pawar comments on Gods name in pune)

वारजे येथील संजीवन वन उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. डुक्कर खिंड परिसरात हा कार्यक्रम होता. या नावाचा संदर्भ देत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, आपण ज्या परिसरात आहोत याला डुक्कर खिंड असं नाव आहे. पुणेकरांनी नावं ठेवण्याच्या बाबतीत देवांनापण सोडलेलं नाही. तिथं माणसांची, जागांची आणि ठिकाणांची काय कथा. 

पवार पुढे बोलताना म्हणाले, हे मी सांगण्यापाठीमागेच कारण असं की, आताचा भाग पूर्वी ग्रामीण भाग होता. इकडनं पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून जायचे. पुण्याचं कार्यक्षेत्र हे नव्हतं. त्यावेळेस या खिंडीला डुक्कर खिंड म्हणून ओळखलं जायचं. आता हे नाव का पडलं ते मला माहिती नाही. पण बहुतेक हा पूर्वीपासून फॉरेस्टचा एरिया म्हणून वर्षानुवर्षे ओळखला जातो. हा भाग गावापासून दूर असल्यानं या भागात रान डूकरांचा वावर जास्त असल्याने या परिसराला डुक्कर खिंड असं नाव पडल्याचं येथील जुनी माणसं सांगतात.

या डुक्कर खिंडीचं नुसतं नाव काढलं तरी पूर्वी खून, मारामाऱ्या, अपघात अशा विचित्र घटनांच्या बातम्या डोळ्यासमोर येतात. हायवेवरून जाताना तर इथून अनेकदा नागरिक म्हणून इथे पडलेले कचऱ्याचे मातीचे ढिगारे मातीत घालण्याचे काम करतात, याचं खूप वाईट वाटतं. मी मागेही सीईओ, कलेक्टर, आयुक्तांना बोलतो यातून काय पर्याय काढता येईल, याबाबत चर्चा केली आहे. आता या परिसराचा बऱ्यापैकी विकास झाला आहे, असंही पवार म्हणाले. 

यापुढं राज्यात फक्त देशी झाडांची लागवड

राज्यात यापुढे वृक्षारोपणासाठी देशी झाडांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील रोपवाटिकांमध्येही केवळ देशी झाडांची रोपं वाढवण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच जिथं वन विभाग पोहचू शकत नाही, त्या भागात ड्रोनच्या माध्यमातून देशी झाडांच्या बिया टाकण्याबाबत विचार सुरू असल्याचंही पवारांनी सांगितलं. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in