आम्ही सहन करतोय म्हणून काहीही बोलायचं का? : योगेश टिळेकर

राजकीय पक्षांच्या नेत्यांना ट्रोलिंग होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यात राज्यातील भाजपचे नेते लक्ष्य जास्त होत असल्याने आता भाजपही त्याविरोधात आक्रमक होणार आहे.
आम्ही सहन करतोय म्हणून काहीही बोलायचं का? : योगेश टिळेकर
yogesh tielkar

पुणे  : या पुढे जर भाजपच्या नेत्यांवर विरोधकांनी मर्यादा सोडून  सोशल माध्यमावर व सार्वजनिक ठिकाणी टीका केली तर त्यांना आम्ही त्याच भाषेत उत्तर देणार आहोत. किती सहन करायचं यांचं? बोलताना त्यांनी मर्यादा ठेवल्या पाहिजेत. आम्ही सहन करतोय म्हणजे काहीही बोलायचं का, असा इशारा भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिला.

"कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं..अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही.  भाजप नेत्यावर केलेल्या अशा विधानांना उत्तर देण्यासाठी भाजपला आक्रमक व्हावे लागेल," असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल व्यक्त केले होते. त्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही आता अशीच भूमिका घेतली आहे.

यावर `सरकारनामा`शी बोलताना टिळेकर म्हणाले की  भाजपच्या नेत्यांना खालच्या भाषेत टीका करण्याची पद्धतच पडून गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की राज्यातील इतर भाजप नेते हे या ट्रोलिंगची शिकार झाले आहे.  आता मात्र ते सहन केले जाणार नाही. योग्य मुद्यांच्या आधारे टीका केली तर ते लोकशाहीसाठी पूरकच आहे. मात्र असभ्य शब्द वापरून नेत्यांना अवमान करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याविरोधात सर्व प्रकारे आता सामना करण्यात येईल. त्यासाठी न्यायालयीन लढाई असो की संबंधितांना योग्य उत्तर असो, यावर आता आक्रमकपणे पावले टाकण्यात येतील. त्यामुळे सोशल मिडियावरील भाजपच्या विरोधकांनी असभ्य टीका करण्याआधी चार वेळा विचार करावा, असा इशारा टिळेकर यांनी दिला.

याबाबत युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या ट्रोलिंगची सुरवात भाजपने केल्याचा दावा केला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी हिणवले गेले. फडणवीस सरकार सत्तेत असताना काॅग्रेस नेत्यांबद्दल अनुदार उदगार काढण्यात आले. आता हाच भस्मासुर भाजपवर उलटला आहे. भाजपने जे पेरले तेच उगवले आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता भाजपला उपरती झाल्याचा दावा तांबे यांनी केला. सोशल मिडियावर भाजप समर्थकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिवाद केला तर त्यालाही तसेच प्रत्युत्तर मिळेल. पण ते खालच्या पातळीवर आले तर इतर पक्षांचे समर्थकही कसे गप्प बसतील, असा सवाल तांबे यांनी केला.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in