शनिवार व रविवारी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडाल तर...

पुणे पोलिसांच्या कठोर सूचना
शनिवार व रविवारी अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडाल तर...
pune sealed area

पुणे : पुणे शहरामध्ये दोन दिवसांचा कडक लाॅकडाऊन शनिवारी व रविवारी असे दोन दिवस राहणार असून अत्यावश्यक कारणांशिवाय या दोन दिवसांत घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांनी केले.

शहरामध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या दोन दिवसांमध्ये वैध कारणाशिवाय नागरीकांनी बाहेर पडू नये. बाहेर पडणाऱ्या नागरीकांकडे ते कुठल्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याबाबतचा पुरावा असायला पाहीजे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शहरामध्ये दोन दिवसांसाठीच्या "विकेंड लॉकडाऊन'ला सुरूवात झाली. या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आत्तापर्यंत चार हजार पोलिस शहरामध्ये तैनात करण्यात आले होते. तर शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांची संख्या सहा हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाईचा बडगा आता उगारण्यात येणार आहे. 

"पोलिस सुरूवातीपासूनच नागरीकांसाठी संवेदनशिलतेने व मानवी दृष्टीकोनातून पाहात आहेत. आता शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने नागरीकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. वैध कारणाशिवाय शहरामध्ये प्रवास करू नये. पोलिसांनी विचारणा केल्यानंतर त्यांना आवश्‍यक ते कारण असलेली ओळखपत्रे, कागदपत्रे दाखवावीत. शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे. आत्तापर्यंत काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना आपला जीव गमावला आहे. कित्येक पोलिस कोरोनाबाधीत झाले आहेत. अशा कठिण काळातही पोलिस नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे नागरीकांनी अत्यंतिक महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच वाहनेही जप्त केली जातील.'' 

सवलतींचा गैरवापर करू नये 
विद्यार्थी, रुग्णाचे नातेवाईक व अन्य काही घटकांना प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. त्या व्यक्तींनी स्वतःजवळ ओळखपत्र बाळगावे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळालेल्या सवलतीचा गैरवापर करु नये. नागरीक अडचणीत असलीतल, तर पोलिसांकडून त्यांना नक्की सहकार्य केले जाईल, असेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in