खुद्द अजितदादांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली... - Deputy CM Ajit Pawar Complains about that police officer to CM | Politics Marathi News - Sarkarnama

खुद्द अजितदादांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

पोलिसांनी योग्य प्रतिमा ठेवण्याचे अजितदादांचे आवाहन 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना जोरदार कानपिचक्या देत चांगले काम करण्याचा सल्ला दिला. तसेच आपली प्रतिमा चांगली राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यासाठी त्यांनी आपला एक अनुभव देखील पुणे पोलिसांच्या एका कार्यक्रमात ऐकवला.  ``मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीस आलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची गाडी 35 लाख रुपयांची होती. चौकशी केल्यानंतर ती गाडी एका उद्योगपतीने दिल्याचे समोर आले. गृहमंमत्री वेगळ्या गाडीत आणि अधिकारी मात्र 35 लाखाच्या गाडीत, ड्युटीवर असताना हे करणे चुकीचे आहे, नियमांचे पालन केलेच पाहीजे,'' अशा शब्दात त्यांनी फैलावर घेतले. हा प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला तसेच या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आपण गृह सचिव सीताराम कुंटे यांना दिल्याचे आवर्जून सांगितले. 

पुणे शहर पोलिस मुख्यालयात अनुकंपा भरती नियुक्तीपत्र व मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रम पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी ते बोलत होते. आपण शासनाचे अधिकारी असताना, कोणत्या उद्योगपतीने दिलेली गाडी ड्युटीवर असताना वापरणे ही विचार करण्यासारखी बाब आहे, असे त्यांनी सांगितले. 

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाविषयी अजित पवार म्हणाले...

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. तपास व्यवस्थित झाल्यानंतर सत्य बाहेर येईल, चूक असेल त्याला शासन झाले पाहीजे, मात्र चुक नसेल तर त्यास निर्दोष जाहीर केले पाहीजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची घटना 7 फेब्रुवारीला मध्यरात्री घडली. पूजाच्या मृत्युच्या घटनेवरुन महाआघाडी सरकारमधील एका राज्यमंत्र्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टिका होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी आयोगाला चौकशीच्या सद्यस्थितीचा अहवाल पाठविला. या पार्श्‍वभूमीवर पवार यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला. त्यावेळी उत्तर देताना पवार म्हणाले, ""या घटनेचा तपास व्यवस्थित होऊन सत्य बाहेर आले पाहिजे. कोणाची चुक असेल तर त्याला शासन झाले पाहिजे. परंतु चूक नसेल तर निर्दोष जाहीर केले पाहिजे. याप्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशी काय आणि कशी करावी याबद्दल मी जास्त सांगु शकत नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख