खबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा - deputy chief minister ajit pawar says weekend lockdown will continue in pune | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

खबरदार, जिल्ह्याबाहेर गेल्यास होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जून 2021

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागल्याने आता वीकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. 

पुणे : शहरात कोरोनाचे (Covid-19) निर्बंध शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी वीकेंडला कडक निर्बंध (Weekend Lockdown) लागू करण्यात आले आहेत. हे दोन्ही दिवशी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. अनेक जण पर्यटनासाठी जिल्ह्याबाहेर जात असून, त्यांना होम क्वारंटाइन करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी कोरोनासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.  विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, निर्बंध शिथिल झाल्यानंतर गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी वीकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. काही जण पुण्यातून महाबळेश्वर तसेच, परराज्यात पर्यटनासाठी अथवा देवदर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी जिल्ह्याबाहेर गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर 15 दिवस विलगीकरणात ठेवावे लागेल.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण झालेले असतानाही तेथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 53 टक्के मृत्यू हे साठ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. त्यापैकी 20 टक्के मृत्यू हे 30 ते 45 वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुणांनीही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पुणे महापालिकेकडूनही अशा स्वरूपाचा अहवाल मागवण्यात आला आहे, असे पवार यांना सांगितले. 

हेही वाचा : नाराज पायलट यांच्यासमोर काँग्रेस नेतृत्व नमले 

केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणाचे नियोजन केले आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्यात दररोज दीड लाख लसीकरणाचे नियोजन आहे. परंतु, केंद्र सरकारकडून अद्याप लस मिळालेली नाही. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर हे लसीकरण शक्य होईल. यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही जाऊन लस देणे शक्य होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

जागतिक आरोग्य संघटनेची कोव्हिशिल्ड लशीला मान्यता असल्याने ती घेतलेल्या व्यक्तींना परदेशी जाण्यास परवानगी आहे. परंतु. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींना ही परवानगी नाही. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर परदेशी जाण्यासाठी पुन्हा कोव्हिशिल्डची लस घेऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे पवार यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख