विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो : चंद्रकांतदादांची सल जाईना

कोरोना काळात राज्य सरकारची अकार्यक्षतमा खपवून न घेण्याचा इशारा
विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो : चंद्रकांतदादांची सल जाईना
mahesh landage-chandrakant Patil

पिंपरी : ' जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो ', सत्तेत न आल्याची सल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.२५) पिंपरीत बोलून दाखवली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जंबो कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी पाटील बोलत होते. त्यानंतर त्यांनी माजी महापौर राहूल जाधव यांच्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं. या दोन्ही कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली होती. लोक एकमेकांना खेटून उभे होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाचा कहर शहरात सुरू आहे.त्यामुळे जमावबंदीसारखे कडक निर्बंध  असताना राजकारण्यांना,मात्र भरगच्च कार्यक्रमासाठी  वेगळे नियम आहेत का ? अशी चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. 

पाटील म्हणाले, कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणं योग्य नाही. मात्र, कोविड आहे म्हणून काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो. 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील धाड हा सीबीआयचा दुरुपयोग असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही चंद्रकांतदादांनी समाचार घेतला. कोर्टानेच या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे का ? असेल तर मग उद्याच कोर्टात अवमानना याचिका दाखल करतो, असा इशारा देतानाच लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे. कोर्टाने केवळ चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात शेवटच्या पॅऱ्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आहेत. यात सत्तेचा दुरुपयोग आला कुठे ? असा सवाल त्यांनी केला. 

सुप्रीम कोर्टाने मोदींना फटकारले की बघा कोर्टाने केंद्राला फटकारले, असं संजय राऊत सांगतात, पण महाराष्ट्राला फटकारले की ते मॅनेज असल्याचा आरोप ते करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. पश्चिम बंगालमध्ये २०० हून अधिक जागा मिळणार आणि पंढरपूर जिंकणार असा दावाही त्यांनी केला. आमचा विजय झाला की ईव्हीएम घोटाळा असतो. त्यांचा विजय झाला की सारं काही अलबेल असतं, असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला. केजरीवाल- मोदी वादावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्याच्या वृत्तावर अशी टीका करणाऱ्यांची कीव येते असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in