नाना पटोले हे तर महाराष्ट्रातले पप्पू : चंद्रकांतदादा भडकले

दादा व नाना यांच्यात आता कलगीतुरा...
नाना पटोले हे तर महाराष्ट्रातले पप्पू : चंद्रकांतदादा भडकले
chandrakantdada-Nana

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची पप्पू म्हणून संभावना केली आहे. पटोले यांना फारस कळत नसतानाही ते विनाकारण टीका करत असल्याचा टोला त्यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना लगावला. 

नाना पटोले यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार करून काहीही फरक पडणार नसल्याचे सांगत नुसते डबे बदलून फायदा नाही, इंजिन बदलायला हवे,`` असा टोला लगावला होता. मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधानच बदलायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावरूनही चंद्रकांतदादांनी टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्य शिखर बॅंकेने विकलेल्या साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील दोन कारखान्यांचाही समावेश होता. त्यावरून पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांनीच गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केल्याकडे लक्ष वेधले होते. 

त्याबद्दल प्रश्न विचारला असता पटोले हे राज्यातील पप्पू आहेत. एक पप्पू राष्ट्रीय राजकारणात आहेत आणि दुसरी नानांच्या रूपाने महाराष्ट्रात असल्याचा टोला चंद्रकांतदादांनी त्यांना लगावला. मी पाठवलेली यादी ही राज्य सरकारने आणि अण्णा हजारे यांनी केलेली आहे. गडकरी यांनी आपल्या कारखान्यांबाबत आधीच स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे  त्याची चौकशीची मागणी मी केलेली नाही. मी फक्त राज्य बॅंकेने लिलाव केलेल्या कारखान्यांची यादी सोबत जोडली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना 63 कोटी रुपयांना विकला जातो आणि त्यानंतर त्याला 700 कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळते, याकडे मी पत्रात लक्ष वेधले आहे. हे पटोलेंना माहीत नसल्याने ते अपुऱ्या माहितीवर बोलत आहेत.

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या व पूर्वी समावेश झालेल्या ११ गावांच्या लोकप्रतिनिधींशी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून त्यांच्या आशा,अपेक्षा आणि अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, माजी आमदार आणि ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,. खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नियोजन शून्यपणे २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ११ गावं समाविष्ट केली. त्या गावच्या डीपीआरचा अद्याप पत्ता नाही. त्यांच्या विकासासाठी निधीचा पत्ता नाही. त्यांच्या आधी देखील जी गावे समाविष्ट करण्यात आली, त्यांचाही विकास झालेला नाही. त्यामुळे नव्याने २३ गावे समाविष्ट करण्याचा आघाडी सरकारचा हट्ट का? हे कळायला मार्ग नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in