अजितदादांनी एक फोन फिरवला आणि औषधे मुंबईहून पुण्यात काही तासांत...

अजित पवार वैद्यकीय मदत करण्यात कधी मागेपुढे पाहत नाहीत...
ajit pawar
ajit pawar

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कैफियत गेल्यानंतर त्यावर तातडीने उपाय मिळाला नाही, असे शक्यतो होत नाही. त्यामुळेच त्यांना भेटून समस्या सांगण्यासाठी आणि मदत मिळविण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. असाच प्रसंग बारामतीत घडला आणि अजितदादांनी तो नेहमीच्या स्टाईलने सोडवला. एका तरुणाच्या वडलांच्या औषधासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणा हलवली आणि काही तासांत ही औषधे संबंधित रुग्णाला मिळाली. (Ajit Pawar dails to Dr. Tatyarao Lahane)

``माझ्यावर 15 लाखांचे कर्ज झालंय. वडिलांच्या डोळ्यावर उपचार करायचे पण आता पैसेच नाहीत, माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही,``हे बोलताना त्याचे डोळे पाणावले होते. ``आम्ही दोघे भाऊ शिकत काम करुन उदरनिर्वाह करतोय, गेले 23 दिवस झाले वडीलांसाठी आम्ही संघर्ष करतोय पण यश येत नाही. पैशांअभावी वडिलांचा एक डोळा अगोदरच गेलेला आहे, आता दुसरा डोळा वाचविणे गरजेचे आहे, दोन दिवसांपूर्वी वडीलांना डिस्चार्ज देणार होते पण बिल भरता येत नसल्याने त्यांना हॉस्पिटल सोडत नाही, असे या तरुणाने सांगितले.

ही कैफियत ऐकल्यानंतर स्वतः अजित पवारही हेवावले. त्यांनी तातडीने स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना फोन लावायला सांगितला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. लहाने यांना या युवकाला हवी असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या नंतर डॉ. लहाने यांनीही ही औषधे काही वेळातच आणली. 

त्या नंतरची अडचण होती ती औषधे मुंबईत आणि त्या युवकाचे वडील पुण्यात दवाखान्यात दाखल होते. सुनीलकुमार मुसळे यांनी मुंबईतील पोलिस कर्मचारी अशोक केदार यांची मदत घेण्याचे ठरविले. केदार मोटारसायकलवरुन जे.जे. रुग्णालयात गेले, दोन बॉक्स मोटारसायकलवर बसत नव्हते, शेवटी त्यांनी त्या औषधांच्या बॉक्ससाठी टॅक्सी केली. टॅक्सीत औषधे व मोटारसायकलवर कसबे असा व्हीटी स्टेशनकडे प्रवास सुरु झाला. मुंबईतून रेल्वेने पुण्यापर्यंत औषधे नेण्याची जबाबदारी पुणे लोहमार्गचे पोलिस निरिक्षक सुरेशसिंग गौड यांनी स्विकारली. त्यांनी निशांत कसबे यांना पुण्याहून मुंबईला ही औषधे आणण्यासाठी पाठविले. 

इकडे मुंबईत  दोन बॉक्स व्यवस्थित नेता येणार नाही म्हणून केदार यांनी क्रॉफर्ड मार्केटमधून नवीन बॉक्स घेतले व त्यात व्यवस्थित औषधांचे पॅकींग केले व ते व्हीटीला आले, तेथे पुणे रेल्वे पोलिस दलातील निशांत कसबे हे वाटच पाहत होते. केदार यांनी कसबे यांना हे औषधांचे बॉक्स दिले. कसबे ही औषधे घेऊन थेट संबंधित रुग्णालयात पोहोचले. 

अजित पवार यांच्या फोन नंतर अवघ्या काही तासात मुंबईतून ही औषधे संबंधित रुग्णापर्यंत पोहोचली. एका रुग्णाला ही औषधे मिळावी या साठी खुद्द उपमुख्यमंत्र्यांपासून ते डॉ. लहाने, सुनीलकुमार मुसळे, सुरेशसिंग गौड, अशोक केदार व निशांत कसबे या सर्वांनी जे एकत्रित प्रयत्न केले त्या मुळे त्या रुग्णाला त्याचा उपयोग झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com