भाजपचे दोन्ही आमदार लाच प्रकरणातील लांडगेंच्या पाठीशी :  मोठे षडयंत्र असल्याचा दावा
Laxman Jagtap Mahesh Landage

भाजपचे दोन्ही आमदार लाच प्रकरणातील लांडगेंच्या पाठीशी : मोठे षडयंत्र असल्याचा दावा

लांडगे स्वतःच श्रीमंत असल्याचा दावा...

पिंपरी : लाचखोरीत काल (ता. १८)अटक झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे (PCMC standing commitee)  अध्यक्ष सत्ताधारी भाजपचे अॅड नितीन लांडगे यांच्या बचावासाठी शहराचे पक्षाचे दोन्ही कारभारी आमदार असलेले भोसरीचे महेश लांडगे (Mahesh Landge) व चिंचवडचे लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आज (ता. १९)धावून आले.

लांडगे हे राजकीय षडयंत्राचे बळी असून त्यामागे मोठा राजकीय हस्तक्षेप असल्याचा दावा त्यांनी केला दरम्यान, अॅड लांडगेसह या गुन्ह्यातील पाच आरोपींना आज पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा आमदार लांडगे आवर्जून उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे व इतर तीन कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल कारवाई करत त्यांना अटक केली. त्यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून अॅड. लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी गुरुवारी केला.

अतिशय खालच्या थराला जाऊन पिंपरी-चिंचवडमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एसीबीने कारवाई कोणत्या आधारावर केली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. केवळ तक्रार केली म्हणून कारवाई केली हे अपेक्षित नाही. कोणताही लेखी पुरावा नसताना, एखादे कॉल रेकॉर्ड नसताना कोणत्या आधारावर कारवाई केली. अ‍ॅड. लांडगे अतिशय स्वच्छ आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या परिवारातील व्यक्तिमत्व आहे. ते राजकारणात केवळ आणि केवळ समाजसेवा म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अशी कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही. या कारवाईबाबत भाजपकडून सत्य बाहेर येईपर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशा सूचना केलेल्या आहेत. तोपर्यंत म्हणजे या प्रकरणाचा पर्दाफाश होईपर्यंत अ‍ॅड. लांडगे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार आहेत, असे आ. लांडगे म्हणाले.

आगामी काळात भाजपाची सत्ता शहरात पुन्हा येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे केवळ राजकीय हेतू ठेवून हा प्रकार रचण्यात आला असल्याचा दावा भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार जगताप यांनीही केला. ते म्हणाले, अ‍ॅड. लांडगे स्वच्छ प्रतिमा आणि घरंदाज व्यक्तिमत्व आहे. त्यांची स्वतःची इतकी मालमत्ता आहे की कोणताही लोभ मनात ठेवून ते काहीही करणार नाही. भारतीय जनता पक्ष हा पिंपरी चिंचवड शहरात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. नागरिकांच्या हिताच्या अनेक चांगल्या गोष्टी भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपाची सत्ता शहरात येणार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे केवळ राजकीय हेतू ठेवून ही एसीबीची कारवाई व्हावी या हेतूने संपूर्णपणे हा प्रकार रचण्यात आलेला आहे. मात्र, सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही. "दूध का दूध और पानी का पानी" होईल असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in