टाटा मोटर्सला नोटीस पाठवणाऱ्या अधिकारी भाजपला नकोशा!

टाटा मोटर्स कंपनीला मिळकतकर विभागप्रमुख स्मिता झगडे यांनी नोटीस बजावली आहे.
BJP demands officers transfer who served notice to Tata Motors
BJP demands officers transfer who served notice to Tata Motors

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठ्या व जगप्रसिद्ध टाटा मोटर्स कंपनीला मिळतकरापोटी नोटीस बजावल्याने पालिकेच्या मिळकतकर विभागप्रमुख स्मिता झगडे सत्ताधारी भाजपच्या निशाण्यावर आल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या गुरुवारच्या (ता.२९) ऑनलाईन सभेत व नंतर बाहेरही त्यांना भाजपने लक्ष्य केले. (BJP demands officers transfer who served notice to Tata Motors)

नोटीस देऊन स्टंटबाजी करणाऱ्या व संपूर्ण तीन वर्षाची कारकिर्द वादग्रस्त राहिलेल्या झगडेंचा करसंकलन विभागाचा कार्यभार काढून घेऊन त्यांना राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी सभेत व नंतर पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली. दरम्यान,झगडेंचा येथील कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे. टाटा मोटर्सने वाढीव बांधकामाची नोंद केली नाही, म्हणून मिळकतकर वसुलीसाठी प्रशासनाने नोटीस दिल्याप्रकऱणी सत्ताधारी नगरसेवक सभेत आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. 

आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक त्यात आघाडीवर होते. निषेधाचे फलक हातात घेवूनच ते सहभागी झाले होते. स्टंटबाज झगडेंना हवा पदोन्नतीचा इनाम, चमकोगिरीच्या हव्यासामुळे करताहेत पालिका आणि शहर बदनाम, प्रामाणिक अधिकाऱ्यांना डिमोशन, आयुक्तसाहेब हे कसले तुमचे मिशन, शहराचे भूषण कंपन्यांना करू नका हैराण, उद्योग निघालेत बाहेर, शहर होईल विराण, आयुक्तसाहेब स्टंटबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवा आणि टाटा मोटर्स व पालिकेची बदनामी थांबवा, अशा घोषणा या फलकावर होत्या.

झगडेंच्या या नोटीसीमुळे पिंपरी चिंचवड शहराची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजपाचे नगरसेवक विकास डोळस यांनी केली. टाटा मोटर्सकडून सर्वसामान्यांप्रमाणेच कर वसूल करा, पण या कंपनीचे शहराच्या जडणघडणीत किती मोठे योगदान आहे. याचाही, जरा विचार करा. शहरातील ७००० लघुउद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत, हे लक्षात ठेवा. देशावर कुठलेही संकट आले तर सर्वप्रथम टाटा ग्रुप धावून जातो आणि मदत करतो. अशा कंपनीला मिळकतकर वसुलीसाठी नोटीस दिल्याने या कंपनीसह शहराचीही नाहक बदनामी झाली,असे डोळस म्हणाले.

झगडेंनी केवळ प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप इतर भाजप नगरसेवकांनीही केला.शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या टाटा कंपनीची नाहक बदनामी केल्याने झगडेंवर कारवाई म्हणून त्यांना पुन्हा शासकीय सेवेत पाठवण्याची मागणी या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सर्वसाधारण सभेनंतर आयुक्तांना प्रत्यक्ष भेटूनही केली. दरम्यान,डोळस सभेत बोलत असताना सभाध्यक्ष महापौर माई ढोरे यांनी त्यांना मधेच थांबवल्याने जेष्ठ नगरसेविका सावळे संतापल्या. 

ऑनलाईन सभेत १२ विषय अवघ्या १२ मिनीटांत मंजूर करता आणि या महत्वाच्या विषयावर नगरसेवक बोलत असतील तर त्यांना थांबवले जाते, हे बरोबर नाही असे त्यांनी  महापौरांना सुनावले. या विषयाचे थोडे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. नगरसेवक बोलत असतील तर त्यांना बोलू दिले पाहिजे. आज टाटा कंपनीची नाहक बदनामी झाल्याने उद्या ही कंपनीच बाहेर गेली, तर ७००० लघुउद्योग बंद पडतील. त्यातून भाजपाची नाहक बदनामी होईल. त्यामुळे अशा विषयावर चर्चा झाली पाहिजे, असे सावळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com