स्थायी समितीचा अध्यक्ष लाचखोरीत सापडला.. तरी भाजपचा स्वच्छ कारभाराचा दावा!

भाजपसाठी युक्तिवाद करणे झालयं अवघड..
स्थायी समितीचा अध्यक्ष लाचखोरीत सापडला.. तरी भाजपचा स्वच्छ कारभाराचा दावा!
PCMC standing committee

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापती हे लाचखोरीच्या गुन्ह्यात पकडले जाऊनही भ्रष्टाचार झालाच नाही व होणारही नाही, असा अजब दावा भाजपने आज (ता.२८) केला. राज्यातील सत्तेच्या जोरावर महाविकास आघाडीने (राष्ट्रवादी) कटकारस्थाने रचून पिंपरी चिंचवड शहर भाजपला बदनाम करण्याचा डाव आखलेला आहे,असा उलट आरोप भाजपचे पालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) व स्थायीतील चार कर्मचारी हे १८ तारखेला लाचखोरीत पकडले गेल्याने भाजपची शहरात व बाहेरही पूरती नाचक्की झाली आहे. विरोधी राष्ट्रवादी व शिवसेनेने त्याचे भांडवल करीत भाजपवर  हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीने,तर नुकताच (ता.२५) पालिकेवर मोर्चा काढून स्थायीसह पालिकाच बरखास्तीची मागणी केली. त्यामुळे ढाके यांनी आज प्रतिवाद करीत या दोन्ही पक्षांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे हे अत्यंत निंदनीय व खालच्या पातळीचे राजकारण आहे, अशी टीका करीत लाचखोरीचे हे षडयंत्र असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. आगामी पालिका निवडणुकीत आपली सत्ता येणार नाही, हे महाविकास आघाडीला कळून चुकल्याने त्यांच्या पायाखालची माती सरकली आहे. त्यामुळे काहीना काही कुरापत्या करून भाजपला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.शहरात गेल्या साडेचार वर्षात मोठया प्रमाणात विकासकामे झाल्याने शहरातील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

पन्नास नगरसेवक निवडून आणून शहरात भगवा फडकावण्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी शहरात येऊन केलेल्या दाव्याचीही ढाकेंनी पोलखोल केली. सत्तेची ही अशी स्वप्ने पाहणाऱ्या शिवसेनेच्या नेतेमंडळींना येणाऱ्या निवडणूकीत आपला स्पष्ट पराभव डोळयासमोर दिसू लागला आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर,जनतेला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोणताही मुद्दा नाही. म्हणूनच ते राज्यातील सत्तेच्या माध्यमातून कारस्थानात  मग्न आहेत. लाचलुचपत विभागामार्फत सुरु असलेली कारवाई हा एक चौकशीचा भाग आहे. यामध्ये कसलाही भ्रष्टाचार झाला नसून होणारही नाही, हेच सिध्द होणार आहे. त्याची पूर्ण खात्रीही आहे. कारण न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, अशी सारवासारव ढाके यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in