भाऊ-दादा गटाला बसणार धक्का...भाजपचे १५-२० नगरसेवक राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत - bjp 15 to 20 corporators of pimpari chinchwad corporation may join ncp | Politics Marathi News - Sarkarnama

भाऊ-दादा गटाला बसणार धक्का...भाजपचे १५-२० नगरसेवक राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत

उत्तम कुटे
मंगळवार, 26 जानेवारी 2021

पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. 

पिंपरी : पुण्यात भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. तर, इकडे पिंपरी-चिंचवडमधील जवळपास तेवढेच भाजपमधील नगरसेवक पुन्हा स्वगृही राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. त्यातील सात जणांचा प्रवेश नक्की असून ते नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपताच कमबॅक करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर असल्याने इच्छा असूनही भाजपमधील अनेक नगरसेवकांना लगेच राष्ट्रवादीमध्ये परतता येत नसल्याचे चित्र आहे.

प्रवेशाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित  पवार हेच घेतील, असेही वाघेरे यांनी स्पष्ट केले आहे. येतील त्यांचे स्वागतच आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रवेश नक्की झालेले नगरसेवक हे शहराचे कारभारी असलेल्या भाजपचे दोन्ही आमदार भोसरीचे महेशदादा लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मतदारसंघासह राष्ट्रवादीचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघातीलही आहेत. सातमध्ये एक अपक्ष आहेत. तसेच त्यात  एक नगरसेविकाही आहे. 

महापालिकेत पाच अपक्ष नगरसेवकांचा वेगळा गट असून त्यांचे सत्ताधारी भाजपला समर्थन आहे. त्यातील चार नगरसेवक राष्ट्रवादीत परतण्याचा दावा करण्यात आल्याने अपक्ष आघाडीला वर्षअखेर खिंडार पडणार आहे. अपक्षांसह भाजपमधील बहुतांश नगरसेवक हे मागील टर्मला राष्ट्रवादीत होते. महापालिकेच्या 2017 च्या  निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील अनेकांची तेथे घुसमट व अडचण होत असल्याने ते परतण्याच्या तयारीत आहेत. 

लगेच प्रवेशाला पक्षांतरबंदी कायद्याचा अडसर आहे. निवडणुकीला अजून १३ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आताच प्रवेश केला, तर पद जाईल त्यामुळे ते लगेच राजीनामा देणार नाहीत. त्यामुळे प्रभागातील कामेही अडून राहण्याची त्यांना भीती आहे. तसेच, महापालिका पदाधिकारी फेरबदलात संधी मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली आहे.

एकूणच ते आताच 'चान्स' घेणार नसून ते 'वेट अॅन्ड वॉच' या पावित्र्यात असल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळेच फेब्रुवारी २०२२ च्या पालिका निवडणुकीपूर्वी म्हणजे या वर्षाच्या शेवटास १५-२० भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येतील,अशी शक्यता वाघेरे यांनी वर्तवली आहे. त्याची तयारी म्हणून अनेक नगरसेवकांनी अजितदादांच्या भेटीही घेतलेल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख