जिल्हा बॅंकेची निवडणूक गाजू लागली : इच्छुक बाळासाहेब नेवाळेंना फसवणूकप्रकरणी अटक

या कारवाईमुळे नेवाळे यांना पीडीसीसीची आगामी निवडणूक आता लढविता येणार नाही.
जिल्हा बॅंकेची निवडणूक गाजू लागली : इच्छुक बाळासाहेब नेवाळेंना फसवणूकप्रकरणी अटक
balasaheb newale

पिंपरी : पुणे दूध संघाचे माजी अध्यक्ष, पीडीसीसीचे (पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक) माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांना पुणे ग्रामीणमधील कामशेत (ता. मावळ) पोलिसांनी आज फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. पुढील महिन्यात होत असलेल्या  पीडीसीसीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या तोंडावर ही अटक झाली आहे. गत विधानसभेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

नेवाळे यांना २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे या गुन्ह्याचे तपासाधिकारी प्रफूल्ल कदम यांनी `सरकारनामा`ला सांगितले. नेवाळे यांच्यासह त्यांच्या गोवित्री (ता.मावळ) गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तोतये संचालक बाळू दाखलू आखाडे, प्रकाश महादू गायकवाड आणि संस्थेचे सचिव (आता निवृत्त) बापू वनाजी दडस यांच्याविरुद्ध बनावट दस्ताऐवज बनवून संस्थेसह संस्थेचे सभासद आणि राज्य शासनाची फसवणूक केल्याबद्दलचा गुन्हा काल दाखल झाला. त्यात लगेच पोलिसांनी अटकही केली. दरम्यान, बाकीचे दोन तोतये संचालक फरारी झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहेत. गायकवाड हा या संस्थेचा चेअरमनही म्हणूनही मिरवत होता.

याबाबत पुणे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे गटसचिव संजय ढोरे यांनी फिर्याद दिली आहे. १५ जानेवारी २०१५ ते २४ डिसेंबर २०१९ दरम्यान घडलेल्या या गुन्ह्याबाबत काल तक्रार येताच लगेच गुन्हाही नोंद होऊन लगेच अटकेचीही कारवाई झाली आहे.

दरम्यान,या कारवाईमुळे नेवाळे यांना पीडीसीसीची आगामी निवडणूक आता लढविता येणार नाही. ही निवडणूक अ गटातून (विकास संस्था) लढविता यावी म्हणून त्यांनी बनावटगिरी करून गोवित्री संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आपली नियुक्ती संचालक मंडळाने केल्याचे दाखवले होते. नंतर तसा प्रस्तावही वडगाव मावळ सहाय्यक निबंधक कार्यालयात देण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात संस्थेची अशी बैठकच झाली नव्हती. तसेच या न झालेल्या बैठकीला उपस्थित असलेले वरील दोघांसह चार संचालक हे संचालकच काय,तर संस्थेचे सभासदही नव्हते. तर, इतर दोन संचालकांच्या खोट्या सह्या करून प्रतिनिधी म्हणून नेवाळेंनी ही नियुक्ती करून घेतल्याचे दिसून आले.

संस्थेच्या शिक्क्यांचाही यासाठी बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला होता. दरम्यान,संस्थेचे नवे सचिव ढोरे यांना संस्थेचे शिक्के नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी ते दडस याच्याकडे मागितले असता या कटकारस्थानाचा सुगावा लागला आणि अॅड. नामदेव दाभाडे यांच्यामुळे ते उघडकीस आले आहे.  नेवाळे यांनी आर्थिक व राजकीय फायद्याकरिता संस्थेचा शिक्का व प्रोसिंडींग बुकाचा गैरवापर करून दोन संचालकांच्या बोगस सह्या केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी दाभाडे यांनी वडगाव मावळ सहाय्यक निबंधक कार्यालयात केली होती. त्यानंतर झालेल्या तपासात ही बनावटगिरी व फसवणूक उघड झाली. दरम्यान, नेवाळे यांनी तीन लाखापर्यंतच्या कर्जावरील व्याज संस्थेव्दारे माफ करून घेतले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in